लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु होतं, अचानक एक तरुण आला गोळ्या झाडल्या; इन्फ्लूएंसरचा जागीच मृत्यू

इन्फ्लूएंसरच्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. तिच्या हत्येचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु होतं, अचानक एक तरुण आला गोळ्या झाडल्या; इन्फ्लूएंसरचा जागीच मृत्यू
Influencer
Image Credit source: Social Media
| Updated on: May 16, 2025 | 7:07 PM

मेक्सिकोतील २३ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हालेरिया मार्केजचा मृत्यू झाला आहे. १४ मे २०२५ रोजी तिच्या ब्यूटी सलूनमधून टिकटॉक लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मेक्सिकोच्या जलिस्को प्रांतातील झापोपन येथे घडली. या हत्येने मेक्सिकोमध्ये खळबळ माजली असून, देशातील वाढत्या हिंसाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

काय नेमकं घडलं?

व्हालेरिया मार्केज सलूनमध्ये टिकटॉकवर लाइव्ह स्ट्रीमिंग करत होती. यावेळी एक व्यक्ती भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने सलूनमध्ये घुसली. त्याने व्हालेरियाची ओळख विचारली आणि लगेच तिच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोर नंतर मोटरसायकलवरून फरार झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहून प्रेक्षकांना धक्का बसला आहे. तसेच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी सांगितले की, हा हल्ला सुनियोजित आणि लक्ष्यित होता.
वाचा: मधुचंद्राच्या रात्रीची तयारी, पत्नी म्हणाली थांब आलेच; मग घेऊन आली दूध, पतीचा बदलला मूड अन्…

पोलिसांचा तपास

झापोपन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. प्राथमिक तपासात हल्लेखोराने व्हालेरियांचा जीव घेण्याचा ठरवूनच हा हल्ला केल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला आहे. तथापि, अद्याप हल्ल्यामागील नेमकं कारण आणि हल्लेखोराची ओळख स्पष्ट झालेली नाही.

मेक्सिकोतील हिंसाचाराची पार्श्वभूमी

मेक्सिकोमध्ये महिलांवरील हिंसाचार हा गंभीर मुद्दा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, मेक्सिकोमध्ये दररोज सुमारे १० महिला किंवा मुलींची हत्या केली जाते. व्हालेरियाच्या हत्येने या समस्येवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. तिच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेकांनी शोक व्यक्त केला, तर काहींनी देशातील असुरक्षिततेवर संताप व्यक्त केला.

व्हालेरिया कोण होती?

व्हालेरिया मार्केज ब्यूटी आणि लाइफस्टाइल व्हिडिओंसाठी टिकटॉकवर प्रसिद्ध होती. तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात होती. तिने आपल्या सलूनमधून नियमितपणे लाइव्ह स्ट्रीमिंग करत प्रेक्षकांशी संवाद साधला. तिच्या अकाली निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.