पाळीव कुत्र्याचं नख लागलं, मालकाने दुर्लक्ष केलं अन्…पुढं जे घडलं ते खूप वाईट
गुजरातच्या अहमदाबादमधील पोलिस निरीक्षक वनराज मांजरीया यांचा त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या नख्याने झालेल्या जखमेमुळे रेबीजमुळे मृत्यू झाला. सुरुवातीला दुर्लक्षित केलेली ही जखम प्राणघातक ठरली.

अनेकांना घरात कुत्रा, मांजर पाळण्याचा शौक असतो. काही वेळा हे प्राणी त्यांच्या मालकांचा जीवही वाचवतात. पण याच लाडक्या पाळीव प्राण्याच्या एका किरकोळ चुकीमुळे एका माणसाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पाळीव कुत्र्याचे नख लागल्याने झालेल्या किरकोळ जखमेतून एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वनराज मांजरीया असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमक काय घडलं?
गुजरातच्या अहमदाबाद शहरात वनराज मांजरीया हे पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी वनराज मांजरीया हे त्यांच्या पाळीव कुत्र्यासोबत खेळत होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या पाळीव कुत्र्याचे नख लागले होते. सुरुवातीला त्यांनी या जखमेकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. ज्याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली. त्यांना काही काळाने रेबीजची लक्षणे दिसू लागली. यामुळे त्यांना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
वनराज मांजरीया यांच्या अकस्मात निधनामुळे त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. तसेच संपूर्ण अहमदाबाद पोलीस दलालाही हा मोठा धक्का आहे. अहमदाबाद शहर पोलिसांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अजिबात दुर्लक्ष करु नका
दरम्यान या घटनेनंतर आपल्या पाळीव प्राण्यांसोबत खेळताना अनेक लोक अशा लहानसहान जखमांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. यामुळे तुम्हाला पाळीव प्राण्यांशी संबंधित आरोग्याचे धोके होऊ शकतात. तसेच रेबीजसारख्या गंभीर आजारांबद्दल जागरूकता वाढवण्याची गरज आहे, असेही या घटनेनंतर बोललं जात आहे. रेबीज हा एक असाध्य रोग आहे, पण योग्य वेळी लसीकरण आणि उपचारांनी तो टाळता येऊ शकतो. त्यामुळे पाळीव प्राण्यांच्या संपर्कात असताना कोणतीही जखम झाल्यास तिला गांभीर्याने घेणे आणि तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते.
