आकाशात चमत्कार! भर रात्री दिसणार स्ट्रॉबेरी मून, कधी आणि कुठे पाहता येणार?
हा चंद्र अत्यंत तेजस्वी आणि मोठा दिसणार आहे. ही घटना दर १८ वर्षे ६ महिन्यांनी घडते. सूर्यास्तानंतर हा चंद्र सहजपणे दिसणार आहे आणि त्याला पाहण्यासाठी कोणत्याही विशेष साधनांची आवश्यकता नाही. २०४३ पर्यंत पुन्हा असा सुपरमून पाहता येणार नाही.

आज बुधवार ११ जून २०२५ हा दिवस धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज रात्री आकाशात तुम्हाला एक अद्भुत दृश्य पाहायला मिळणार आहे. आज ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र लाल, चमकदार, रंगीबेरंगी आणि मोठा दिसणार आहे. याला ‘स्ट्रॉबेरी मून’ असे नाव देण्यात आले आहे. हा यंदाच्या वर्षातील सर्वात तेजस्वी चंद्र असणार आहे.
दर १८ वर्ष ६ महिन्यांनी घडते ही घटना
‘स्ट्रॉबेरी मून’ हा स्ट्रॉबेरीसारखा दिसत नाही. तसेच त्याचा रंग गुलाबी नसतो. पौर्णिमेचा उपयोग पूर्वी ऋतूंचा मागोवा घेण्यासाठी केला जात असे. हा चंद्र साधारणपणे उन्हाळी संक्रांतीच्या आसपास येत असल्याने जून महिन्यातील पौर्णिमा किंवा ज्येष्ठ पौर्णिमेला ‘स्ट्रॉबेरी मून’ म्हणून ओळखले जाते.
या वर्षातील ज्येष्ठ पौर्णिमेचा चंद्र स्थिर स्वरूपाचा असेल. ही ती वेळ असते, जेव्हा चंद्र पृथ्वीभोवतीच्या आपल्या कक्षेच्या चरम सीमेवर पोहोचतो. ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे. ही घटना दर १८ वर्ष ६ महिन्यांनी घडते. या घटनेचा प्रभाव पौर्णिमेच्या दिवशी सर्वाधिक पाहायला मिळतो. अशाप्रकारे स्ट्रॉबेरी मून हा आता थेट २०४३ नंतरच दिसू शकतो, असे खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
Look up tonight for something sweet!
The full Strawberry Moon, named by the Algonquin tribes for the time of year that berries ripen, will take to the night skies on June 10-11. pic.twitter.com/GKr41bGUUV
— NASA (@NASA) June 10, 2025
भारतात स्ट्रॉबेरी मून कधी आणि कुठे बघाल?
आज, ११ जून २०२५ रोजी तुम्ही आकाशात स्ट्रॉबेरी मूनचे अद्भुत दृश्य पाहू शकता. बुधवारी सूर्यास्तानंतर हा चंद्र दिसेल. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटे आहे. यानंतर तुम्हाला स्ट्रॉबेरी मून पाहता येणार आहे. हा चंद्र पाहण्यासाठी कोणत्याही विशेष खबरदारीची गरज नाही. कारण यामुळे डोळ्यांना कोणतीही हानी पोहोचणार नाही. तुम्ही तुमच्या घराच्या छतावरून सहजपणे हा चंद्र पाहू शकता. अधिक चांगल्या दृष्यासाठी दुर्बिण किंवा टेलिस्कोपचा वापर करू शकता.
