‘हा’ होता जगातील सर्वात धोकादायक जादूगार, ज्याने अनेकदा मृत्यूलाही दिला चकवा

तो कुलुपं तोडायचा, साखळदंडांना आव्हान द्यायचा आणि बंद पेट्यांमधून असा काही बाहेर यायचा की बघणारे थक्क व्हायचे! कोण होता हा 'जादूचा बादशाह', ज्याने मृत्यूलाही अनेकदा चकवा दिला? चला, ओळख करून घेऊया या महान जादूगाराशी!

हा होता जगातील सर्वात धोकादायक जादूगार, ज्याने अनेकदा मृत्यूलाही दिला चकवा
magician
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 29, 2025 | 11:10 AM

जादू आणि जादूगारांचे जग नेहमीच रहस्य आणि आश्चर्याने भरलेले राहिले आहे. आज इंटरनेटच्या युगात जादूची दुनिया काहीशी कमजोर झाली असली तरी, या जगात असे काही जादूगार होऊन गेले ज्यांची नावे अजरामर झाली आहेत. ज्याप्रमाणे भारतात पी. सी. सरकार किंवा जादूगार आनंद यांची नावे जादूच्या दुनियेत आदराने घेतली जातात, त्याचप्रमाणे पाश्चिमात्य जगात एक मोठे नाव म्हणजे हॅरी हुडिनी… एक असा जादूगार, ज्याने केवळ अविश्वसनीय जादू दाखवली नाही, तर त्याने जादूच्या दुनियेला एक नवीन ओळख आणि प्रतिष्ठा दिली. तो मृत्यूलाही चकवा देण्याच्या कलेत माहिर होता. चला तर मग, जाणून घेऊया या ‘जादूच्या बादशहा’ विषयी.

जादूगार हॅरी हूडिनी कोण होता?

हॅरी हुडिनीचं खरं नाव एरिक वाईस होतं. त्याचा जन्म हंगेरीमध्ये झाला, पण गरिबीमुळे त्याचं कुटुंब अमेरिकेत स्थायिक झालं. लहानपणी त्याने डिलिव्हरी बॉयचं काम केलं. ‘Memoirs of Robert-Houdin’ या फ्रेंच जादूगाराचं पुस्तक वाचून तो इतका प्रभावित झाला की त्याने जादूगार बनण्याचा निश्चय केला आणि रॉबर्ट हुडिन यांच्या नावावरून आपलं नाव ‘हॅरी हुडिनी’ असं ठेवलं.

अविश्वसनीय सुटकेचे प्रयोग

हुडिनीची खरी ओळख होती ती कोणत्याही बंधनातून सुटण्याची अद्भुत क्षमता. हातकड्या, साखळदंड किंवा बंदिस्त पेट्यांमधून तो सहज बाहेर पडायचा. असं कोणतंच कुलूप नव्हतं, जे त्याला बांधून ठेवू शकेल! पोलीस कोठडीतूनही तो लोकांच्या डोळ्यांदेखत निसटायचा. त्याचे हे ‘Escape Acts’ जगभर प्रसिद्ध झाले.

मृत्यूशी खेळणारे स्टंट्स

हॅरी हुडिनीची खरी ओळख त्याच्या मृत्यूशी खेळणाऱ्या धोकादायक स्टंट्समुळे झाली. वेळेच्या मर्यादेत एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या सापळ्यातून वाचवण्याचे थरारक स्टंट्स तो करू लागला. याच स्टंट्सनी त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवले. त्याच्या एका प्रसिद्ध स्टंटबद्दल सांगितले जाते की, एकदा त्याला एका पेटीत बंद करून पाण्याखाली बुडवण्यात आले होते. त्यावेळी केवळ ५७ सेकंदात त्या पेटीतून बाहेर येऊन त्याने उपस्थित प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. कोणत्याही बंधनातून किंवा मृत्यूच्या दारातून परत येण्याची त्याची ही कलाच त्याला ‘जादूचा बादशाह’ बनवून गेली.

हॅरी हुडिनी हा केवळ जादूगार नव्हता, तर एक उत्तम Showman होता. त्याने जादूच्या सादरीकरणात क्रांती आणली. त्याची अविश्वसनीय सुटका आणि धाडसी स्टंट्समुळे तो इतिहासातील महान जादूगारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याची कहाणी आजही अनेकांना प्रेरणा देते.