हॉटेल बेडवरचा पातळ कपडा सजावटीचा नाही, हे आहे त्यामागचं वास्तविक कारण
हॉटेलमध्ये राहायला गेल्यावर तुम्हीही बेडवर ठेवलेला तो पातळ आणि आकर्षक दिसणारा पट्टा नक्कीच पाहिला असेल. अनेकांना वाटतं की तो फक्त सजावटीसाठी असतो, पण प्रत्यक्षात त्यामागे एक उपयोगी आणि स्वच्छतेशी संबंधित कारण आहे. चला तर मग, जाणून घेऊया त्याचं नेमकं काम काय आहे ?

पर्यटनाची आवड असणाऱ्या अनेकांना हॉटेलमध्ये राहण्याचा अनुभव येतो. तुम्हीही कधी ना कधी हॉटेलमध्ये थांबले असाल. अशा वेळी तुम्ही एक गोष्ट नक्कीच पाहिली असेल बेडवर पांढऱ्या चादरींवर अंथरलेलं एक पातळ रंगीत कापड. हे पाहून अनेकांना वाटतं की ही केवळ सजावटीची बाब आहे. मात्र प्रत्यक्षात हे केवळ सौंदर्यवृद्धीसाठी नसून, यामागे स्वच्छता आणि ग्राहकांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचं कारण असतं.
या कापडाला ‘बेड रनर’ (Bed Runner) असं म्हणतात. हे मुख्यत्वे बेडशीटवर आडव्या दिशेने अंथरलं जातं आणि त्याचा उपयोग केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नाही, तर बेडशीट स्वच्छ ठेवण्यासाठीही होतो.
बेड रनर म्हणजे नेमकं काय?
जेव्हा एखादा ग्राहक हॉटेलच्या खोलीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचं लक्ष थेट बेडकडे जातं. स्वच्छ पांढऱ्या चादरी, सुबक ठेवलेले उशांचे खोळ, आणि त्यावर ठेवलं गेलेलं एक रंगीत, डिझाइन असलेलं पातळ कापड हाच तो बेड रनर असतो.
अनेकदा लोक याबाबत गोंधळतात की हे झाकण्यासाठी आहे का झोपण्यासाठी, पण खरंतर ना हे झाकण्यासाठी आहे, ना वापरण्यासाठी – याचा उद्देश वेगळाच आहे.
स्वच्छतेचं रक्षण करणारा
बेड रनरचा मुख्य उद्देश म्हणजे बेडशीटवर थेट धूळ, मळ किंवा किटाणू येऊ न देणं. आपण जेव्हा बाहेरून येतो, तेव्हा आपली बॅग, पर्स, मोबाईल किंवा जॅकेट थेट बेडवर ठेवतो. या वस्तूंवर अनेकदा धूळ किंवा घाण असते. जर त्या थेट चादरीवर ठेवण्यात आल्या, तर चादर लगेचच मळते. पण बेड रनरमुळे हे टळतं आणि बेडशीट जास्त काळ स्वच्छ राहते.
हे कापड विशेष फॅब्रिकपासून बनवलेलं असतं, ज्यामुळे त्यावर डाग लागले तरी ते सहज निघतात आणि ते वारंवार धुणं शक्य होतं. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनासाठी हे खर्चिकही ठरत नाही.
खोलीच्या सजावटीला उठाव
हॉटेलमध्ये सामान्यतः पांढऱ्या रंगाच्या चादरी आणि ब्लँकेट्स वापरली जातात. अशा वातावरणात थोडा रंग येण्यासाठी आणि खोलीत सौंदर्याची झलक यावी म्हणून बेड रनर वापरला जातो. हा लहानसा रंगीत भाग बेड अधिक आकर्षक बनवतो आणि पाहणाऱ्यावर सकारात्मक प्रभाव टाकतो.
तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही बेडवर काही ठेवणार नाही, तर तो कापड बाजूला ठेवणं शक्य आहे. पण त्याचा हेतू समजून घेणं महत्त्वाचं आहे.
थोडक्यात, हॉटेलच्या बेडवर दिसणारं हे रंगीत पातळ कापड केवळ सजावटीसाठी नसून, ते अत्यंत उपयुक्त आणि विचारपूर्वक ठेवलेलं आहे. स्वच्छता टिकवण्यासाठी, खोलीचं सौंदर्य वाढवण्यासाठी आणि ग्राहकांचा अनुभव चांगला करण्यासाठी बेड रनरचा उपयोग केला जातो. आता पुढच्या वेळी हॉटेलमध्ये गेल्यावर हे कापड दिसलं, तर त्यामागचं हेतू लक्षात ठेवायला विसरू नका.
