महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापूरच्या नांदणी मठात परतणार? काय आहे प्रकरण?

महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी पुढे आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. त्यामुळे महादेवी हत्तीण परत कोल्हापूरच्या मठात येईल असे म्हटले जात आहे.

महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापूरच्या नांदणी मठात परतणार? काय आहे प्रकरण?
Mahadevi Elephant
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 01, 2025 | 2:04 PM

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष आहे. हत्तीणीला निरोप देताना गावकरी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण भावूक झाले. निरोपापूर्वी गावकऱ्यांनी हत्तीणीची मिरवणूक काढली होती. आता महादेवीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे.

स्वाक्षरी मोहीम आणि हालचाल

महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी अवघ्या 24 तासांत 1 लाख 25 हजार 353 लोकांनी स्वाक्षरी केली आहे. यासोबतच एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. वनतारा प्रकल्पाचे सीईओ विहान करणी आणि त्यांची टीम नांदणीला भेट देण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर येणार आहे. यावेळी ते नांदणी मठातील महाराजांची भेट घेणार आहेत. त्यामुळे महादेवी हत्तीण पुन्हा नांदणीत परत येण्याची शक्यता आहे का? याबाबत गावकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

वाचा: माझे 900 रुपये मला परत द्या, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपातून निर्दोष सुटताच समीर कुलकर्णी यांची मागणी; काय घडलं होतं नेमकं?

प्रकरण नेमके काय?

‘पेटा’ या प्राणी हक्क संघटनेने नांदणी मठातील महादेवी हत्तीणीचा वन विभागाच्या परवानगीशिवाय मिरवणुकीसाठी वापर केल्याचा आरोप केला होता. यानंतर प्रकरण न्यायालयात गेले आणि चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला, ज्यात प्राण्यांच्या हक्कांना प्राधान्य देण्याचे नमूद करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने महादेवीला गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्याचा आदेश दिला. नांदणी मठाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु ती फेटाळण्यात आली. त्यामुळे महादेवी हत्तीण गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्यात आली.

ग्रामस्थांचा रोष

नांदणी मठ हा जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे आणि गेल्या 33 वर्षांपासून महादेवी हत्तीण या मठाचा अविभाज्य भाग होती. कोर्टाच्या निर्णयामुळे गावकरी संतप्त झाले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, पण तिथेही त्यांना निराशा हाती लागली. महादेवीला वनताराला पाठवण्याच्या निर्णयाने गावकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.

सतेज पाटील यांची पोस्ट

सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, महादेवीला परत आणण्यासाठी 24 तासांत 1 लाख 25 हजार 353 स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ही स्वाक्षरी मोहीम 1 ऑगस्ट (शुक्रवार) रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शनिवारी, 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता नांदणी मठात स्वामीजींच्या हस्ते या स्वाक्षरी फॉर्मचे पूजन होईल. त्याच दिवशी दुपारी 1 वाजता कोल्हापूरच्या रमणमळा पोस्ट ऑफिसमधून हे फॉर्म स्पीड पोस्टद्वारे राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवले जाणार आहेत.