विमानातच नाही, ट्रेनमध्येही आहे लगेजचं वजन ‘लिमिट’, नियम मोडल्यास बसेल मोठा फटका
ट्रेन प्रवासाला निघताना बॅगा भरताय? वाटतंय ना, की कितीही सामान घेतलं तरी काय फरक पडतो, विमानात थोडीच चाललोय! पण थांबा जरा! तुम्हाला माहित आहे का, भारतीय रेल्वेचे पण सामानासाठी नियम आहेत आणि ते मोडले तर तुमच्या खिशाला मोठा फटका बसू शकतो? किती किलो सामान कोणत्या डब्यात मोफत नेता येतं आणि नियम तोडल्यास काय होतं? चला, गैरसमज दूर करूया आणि रेल्वेच्या सामानाच्या नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊया!

आपल्यापैकी अनेकांना वाटतं की विमानात प्रवास करताना सामानाचं वजन अगदी काटेकोरपणे मोजलं जातं, पण ट्रेन प्रवासात कितीही बॅगा भरल्या तरी कोण विचारतंय? पण थांबा, तुमचा हा अंदाज थोडा चुकीचा आहे! जसे विमानात नियम असतात, तसेच भारतीय रेल्वेने सुद्धा ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोबत किती सामान घेऊन जावं, याचे काही नियम ठरवले आहेत. हे नियम आपल्याला माहीत नसतील किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष केलं, तर प्रवासात ऐनवेळी अडचण येऊ शकते आणि खिशाला मोठा फटकाही बसू शकतो. चला तर मग, आज सविस्तर जाणून घेऊया की ट्रेनच्या वेगवेगळ्या डब्यात तुम्ही किती किलो सामान मोफत नेऊ शकता आणि लिमिटपेक्षा जास्त सामान असेल तर काय होतं?
प्रत्येक डब्यासाठी आहे वेगळे नियम:
तुम्ही रेल्वेच्या कोणत्या क्लास मधून प्रवास करत आहात, यावर तुम्ही किती वजनाचं सामान सोबत मोफत नेऊ शकता हे अवलंबून आहे. भारतीय रेल्वेचे नियम खालीलप्रमाणे आहेत:
सेकंड क्लास (2S): जर तुम्ही सेकंड क्लासमधून प्रवास करत असाल, तर तुम्ही ३५ किलो पर्यंत सामान सोबत ठेवू शकता.
स्लीपर क्लास (SL): स्लीपर क्लासच्या प्रवाशांना ४० किलो वजनापर्यंत सामान मोफत नेण्याची परवानगी आहे. यावर साधारणपणे अजून १० किलोपर्यंत सामान नेल्यास सहसा अडवलं जात नाही किंवा त्याची रीतसर नोंदणी करता येते.
एसी चेअर कार (CC) आणि एसी ३ टियर (3A): या दोन्ही एसी डब्यांमध्ये तुम्ही ४० किलो पर्यंत सामान मोफत नेऊ शकता. स्लीपर क्लासप्रमाणेच इथेही अतिरिक्त १० किलोपर्यंत सामानाची सवलत मिळते.
एसी २ टियर (2A): टू-टियर एसीमध्ये तुम्हाला थोडी जास्त सवलत मिळते. इथे तुम्ही ५० किलो पर्यंत सामान मोफत नेऊ शकता आणि त्यावर अतिरिक्त १० किलो सामान न्यायला परवानगी असते.
फर्स्ट क्लास एसी (1A): फर्स्ट क्लास एसीच्या प्रवाशांना सर्वात जास्त सामान नेण्याची मुभा आहे. ते ७० किलो पर्यंत सामान मोफत आणि त्यावर अतिरिक्त १५ किलो पर्यंत सामान सोबत घेऊ शकतात.
लिमिट ओलांडल्यास काय?
जर तुमच्या सामानाचं वजन ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही त्या जास्तीच्या सामानाची रेल्वेच्या ऑफिसमध्ये जाऊन आगाऊ नोंदणी केली नसेल, तर काय होईल? अशावेळी जर तुम्ही तपासणीत सापडलात, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.
नियमानुसार, जेवढं सामान लिमिटपेक्षा जास्त आहे, त्या वजनाच्या सामानासाठी जेवढं सामान्य बुकिंग शुल्क आहे, त्याच्या सहापट रक्कम तुम्हाला दंड म्हणून भरावी लागते. उदाहरणार्थ, समजा तुमचं अतिरिक्त सामान ५० किलो आहे आणि त्याचं सामान्य बुकिंग शुल्क १०० रुपये आहे. पण तुम्ही बुकिंग न करताच प्रवास करत असाल, तर तुम्हाला दंड म्हणून ६०० रुपये भरावे लागतील!
