आता रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी नवा नियम, अन्यथा तिकीट बुकींग करणं होईल कठीण
IRCTC कडून लागू करण्यात येत असलेल्या तात्काळ तिकीट बुकिंगवरील आधार पडताळणीचा नियम तुम्ही अद्याप पूर्ण केला नसेल तर या नव्या नियमांतर्गत काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या IRCTC खात्यात आधार कसे लिंक आणि व्हेरिफाय करू शकता, हे जाणून घेऊया. तसेच जाणून घेऊया काय आहे संपूर्ण नियम.

तुम्हीही IRCTC च्या माध्यमातून तात्काळ तिकीट बुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत, जे 1 जुलै 2025 पासून लागू होईल. या बदलांनुसार आता आधार व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात आले आहे. काय आहेत नवे नियम आणि तुम्ही तुमचे IRCTC खाते आधारशी लिंक करून तात्काळ तिकीट कसे बुक करू शकता, जाणून घेऊया.
काय आहे नवा नियम?
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ तिकीट बुकिंग प्रणालीत मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे. 1 जुलै 2025 पासून तात्काळ तिकिटे फक्त त्या युजर्सना उपलब्ध असतील ज्यांनी IRCTC च्या वेबसाइट किंवा अॅपवर आधारवरून KYC यशस्वीरित्या केले आहे.
तसेच 15 जुलै 2025 पासून तात्काळ तिकीट बुक करताना OTP आधारित आधार व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच ऑनलाइन आरक्षणासाठी आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर OTP येईल. बुकिंग विंडोच्या पहिल्या 30 मिनिटांमध्ये केवळ आधार प्रमाणित आणि KYC व्हेरिफाइड युजर्सना तात्काळ तिकीट बुक करण्याची परवानगी असेल. अस्सल प्रवाशांना तिकिटे देण्यासाठी आणि दलालांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
IRCTC खात्याशी आधार कसे लिंक करावे?
तुम्हाला IRCTC अकाऊंटमध्ये आधार कार्ड व्हेरिफिकेशन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
IRCTC अकाऊंटमध्ये आधार कार्ड व्हेरिफिकेशन
- सर्वप्रथम, IRCTC च्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवर जा आणि आपल्या लॉगिन क्रेडेन्शियल्ससह लॉगिन करा.
- त्यानंतर ‘माय अकाउंट’ टॅबवर जाऊन ‘ऑथेंटिकेट युजर’ हा पर्याय निवडा.
- त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल ID टाका.
- त्यानंतर ‘व्हेरिफाय डिटेल्स’वर क्लिक करा. यानंतर तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाइल नंबरवर OTP येईल.
- OTP प्रविष्ट करा, संमतीने बॉक्सटिक करा आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा.
IRCTC प्रोफाइलमध्ये आधार लिंक कसे करावे?
- सर्वप्रथम IRCTC च्या वेबसाइटवर जाऊन लॉगिन करा.
- प्रोफाईल टॅबवर जाऊन ‘लिंक आधार’वर क्लिक करा.
- आधारनुसार नाव आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा.
- संमती बॉक्सवर टिक करा आणि ‘OTP पाठवा’ वर क्लिक करा.
- आधारशी जोडलेल्या मोबाइलवर OTP भरा आणि ‘व्हेरिफाय OTP’ वर क्लिक करा.
- आधारवरून केवायसीचा तपशील प्राप्त होताच ‘अपडेट’ बटणावर क्लिक करा.
- एक पॉपअप मेसेज दिसेल: “आधार व्हेरिफिकेशन सक्सेसफुल” म्हणजे तुमची KYC पूर्ण झाली आहे.
