शेअर बाजारात गुंतवणूक करताय? जागतिक अस्थिरतेच्या काळात तीन टीप्स नक्की लक्षात ठेवा
शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळवण्याची इच्छा आहे, पण अमेरिका-चीनमधील 'ट्रेड वॉर'च्या बातम्या ऐकून मनात धाकधूक वाढलीय? जागतिक तणावाच्या काळात आपला कष्टाचा पैसा सुरक्षित राहील की नाही, ही चिंता तुम्हालाही सतावत असेल!

सध्याच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक ही फक्त चांगला परतावा मिळवण्याचं साधन न राहता, आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. पण बाजार म्हणजे फक्त तेजीच नाही, तर घसरणीचाही खेळ आहे. विशेषतः जागतिक पातळीवरील घडामोडी, मोठ्या अर्थव्यवस्थांमधील तणाव, आणि अमेरिका-चीनसारख्या देशांमधील व्यापार युद्धाचे संकेत हे सगळं गुंतवणूकदारांना सतत धास्ती देणारं ठरतं. त्यामुळे बाजारात पैसे टाकण्यापूर्वी काही महत्वाचे नियम पाळणं आवश्यक आहे.
1. अंदाजावर नव्हे, माहितीवर आधारित निर्णय घ्या!
शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी ‘कुणीतरी सांगितलं म्हणून’ पैसे लावणं हे धोरण आत्मघातकी ठरू शकतं. तुमचं गुंतवणुकीचं प्रत्येक पाऊल अभ्यासावर आधारित असावं. कंपनीचा मागील आर्थिक परफॉर्मन्स, व्यवस्थापनाची पारदर्शकता, उद्योगातील स्थान आणि भविष्यातील वाढीच्या शक्यता – या सगळ्याचा अभ्यास करूनच निर्णय घ्या. कारण जागतिक स्तरावर एखादं निर्णय घेतलं गेलं, तर त्याचे पडसाद तुमच्या गुंतवणुकीवर ताबडतोब उमटू शकतात.
2. ‘डायव्हर्सिफिकेशन’ हेच संरक्षण!
सर्व पैसे एका कंपनीत किंवा एका सेक्टरमध्ये गुंतवणं म्हणजे आर्थिक दृष्टीने एक मोठं धोका उचलणं. बाजारात अस्थिरता असताना विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केल्यास एकूण धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. विशेषतः आयटी, फार्मा आणि आवश्यक वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपन्या अशा काळात तुलनेने स्थिर राहतात. त्यामुळे गुंतवणुकीचा ‘पोर्टफोलिओ’ वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये विभागलेला असावा.
3. जोखीम नियंत्रणासाठी ‘स्टॉप लॉस’ वापरा
बाजार पडतोय हे कळल्यानंतर हातातले शेअर्स विकून नुकसान टाळणं ही एक गोष्ट; पण प्रत्येक व्यवहारात ‘स्टॉप लॉस’सारख्या साधनांचा वापर केल्यास हे नुकसान आधीच मर्यादित करता येतं. शेअरची विशिष्ट किंमत ठरवा — ती खाली गेली की तो शेअर आपोआप विकला जाईल, असा आदेश द्या. यामुळे अनपेक्षित बाजार कोसळण्याच्या काळातही तुमचा आर्थिक झटका कमी होतो.
