सेन्सेक्स एक लाखांचा टप्पा कधी गाठणार, तज्ज्ञ काय म्हणतात, कोणत्या शेअर्सच्या किंमती वाढणार?

Share Market | दीर्घकाळाचा विचार करायचा झाल्यास 2025 पर्यंत सेन्सेक्स सध्याच्या दरापेक्षा दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. डिसेंबर 2025 पर्यंत सेन्सेक्स 125000 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

सेन्सेक्स एक लाखांचा टप्पा कधी गाठणार, तज्ज्ञ काय म्हणतात, कोणत्या शेअर्सच्या किंमती वाढणार?
शेअर बाजार

मुंबई: पैसे कमावण्याचा झटपट मार्ग म्हणून भांडवली बाजाराकडे (Share Market) पाहिले जाते. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे जोखमीचे काम असले तरी योग्य धोरण आखून दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणुकीवर तुलनेत जोखीमही कमी असते. त्यामुळे ब्लु चीप किंवा मिड कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय ठरतो. (Stock market trading tips)

गेल्या काही दिवसांत शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी सार्वकालिक उच्चांक पार केले आहेत. गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने 60 हजारांच्या टप्प्याला गवसणी घातली होती. अवघ्या 9 महिन्यांत सेन्सेक्स 10000 अंकांनी वधारला आहे. त्यामुळे आता शेअर बाजारात सेन्सेक्स लवकरच एक लाखांचा टप्पा गाठणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 60 हजार ऐतिहासिक पातळी आहे. आता बाजारात करेक्शन येण्याची शक्यता आहे. त्यानंतर शेअर बाजार पुन्हा उसळी घेऊन एक लाखांचा टप्पा पार करेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

ऑक्टोबरमध्ये घसरण होणार

सप्टेंबर महिन्यात सेन्सेक्सने 60 हजारांचा विक्रमी टप्पा गाठल्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये शेअर बाजारात घसरण पाहायला मिळू शकते. गुंतवणुकदारांच्या प्रॉफिट बुकिंगमुळे शेअर बाजारात येत्या काही दिवसांत शेअर बाजारात 10 ते 20 टक्क्यांची घसरण पाहायला मिळू शकते, असे मत स्वास्तिक इन्वेस्टमेंचे सर्वेसर्वा संतोष मीणा यांनी व्यक्त केले.

बँकिंग सेक्टरमध्ये तेजी

येत्या काही दिवसांमध्ये बँकांच्या समभागांचा भाव वधारण्याची शक्यता इक्विटी 99 च्या राहुल शर्मा यांनी व्यक्त केली. बँकिंग क्षेत्रातील तेजीमुळे शॉर्ट टर्ममध्ये सेन्सेक्स 66 हजार आणि निफ्टी 20 हजारापर्यंत मजल मारू शकते. तथापि, या टप्प्यावर खरेदी टाळण्याचा सल्ला दिला जातो. सध्या गुंतवणूकदारांना एसआयपी करण्याचा सल्ला दिला जात आहे.

2025 पर्यंत सेन्सेक्स दीड लाखांचा टप्पा ओलांडणार

दीर्घकाळाचा विचार करायचा झाल्यास 2025 पर्यंत सेन्सेक्स सध्याच्या दरापेक्षा दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. डिसेंबर 2025 पर्यंत सेन्सेक्स 125000 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

मार्च 2020 मध्ये सेन्सेक्समध्ये 3900 अंकांची घसरण

23 मार्च 2020 रोजी बीएसई सेन्सेक्स जवळपास 13.15 टक्क्यांनी म्हणजे 3,934.72 अंकांनी घसरून 25,981.24 च्या पातळीवर आला. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेमुळे सेन्सेक्समध्ये एवढी मोठी घसरण झाली. परंतु मार्च 2020 च्या मोठ्या पडझडीनंतर भारतीय शेअर बाजारात अभूतपूर्व वाढ झाली आहे.

अवघ्या एका महिन्यात सेन्सेक्स 54,000 वरून 56,000 वर गेला. सुधारित मॅक्रोइकॉनॉमिक डेटा, किरकोळ गुंतवणूकदारांकडून वारंवार खरेदी, चांगली कमाई आणि लसीकरणाची वाढलेली गती यामुळे बाजाराच्या तेजीला चालना मिळाली. आर्थिक व्यवहार विभागाने जाहीर केलेल्या मासिक आर्थिक पुनरावलोकनात असे म्हटले आहे की दुसऱ्या लाटेचा प्रभाव असूनही भारतीय अर्थव्यवस्थेचा पूर्वपदावर येण्याचा आलेख व्ही-आकाराचा आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ 20.1 टक्के होती.

या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल

गेल्या काही काळात बाजारातील अनेक स्मॉल आणि मिडकॅप समभागांमुळे गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला आहे. अल्किल अमाईन्सच्या स्टॉकने 2021 मध्ये 166 टक्के परतावा दिला आहे. शेअरची किंमत 1,533 रुपयांवरून 4,136.85 रुपये झाली. गेल्या पाच वर्षांत या शेअरमध्ये 3,201 टक्के वाढ झाली आहे आणि गेल्या 10 वर्षांत 23,647 टक्के वाढ झाली आहे.

GNA Axles च्या स्टॉकने 2021 मध्ये 190 टक्के परतावा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून समभागाच्या किंमतीत वाढ होत आहे. दुसरीकडे, आंध्र पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (आंध्र पेट्रोकेमिकल्स लिमिटेड) मधील गुंतवणूकदारांना गेल्या 12 महिन्यांत 395 टक्के परतावा मिळाला आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून त्यात 194 टक्के वाढ झाली आहे.

एचजी इन्फ्रा अभियांत्रिकी देखील 2021 मध्ये परतावा देण्याच्या बाबतीत मागे नाही. या समभागाने 180 टक्के परतावा दिला आहे. केपीआर मिल्स लि. परताव्याच्या बाबतीतही कोणापेक्षा कमी नाही. या वर्षाच्या सुरुवातीपासून या समभागाने 300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

संबंधित बातम्या:

Sensex : भारतीय शेअर बाजाराने इतिहास रचला, पहिल्यांदाच सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा गाठला!

Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांनो 30 सप्टेंबरपर्यंत ‘हे’ काम आटपा, अन्यथा ट्रेडिंगला लागेल ब्रेक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI