Ujwal Nikam : आमच्याकडे प्रत्येक तारखेचा पुरावा आहे, त्यामुळे.. ; पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी पार पडल्यानंतर त्याबद्दल माहिती देण्यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोठा दावा केला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचा खून एका मोठ्या कटाचा परिपाक आहे. हा कट कसा शिजला हे तारखेप्रमाणे न्यायालयाला सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा आहे, असा मोठा दावा सरकारी वकील उज्वल निकम यांनी आज केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी दरम्यान काय काय झालं याबद्दल माहिती देण्यासाठी उज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. वाल्मिक कराडने ज्याप्रमाणे धमकी दिली, त्याप्रमाणे गँग लीडर सुदर्शन घुले तिथे प्रत्यक्ष आला. सुदर्शन घुलेने देखील धमकीचा पुनरुच्चार केला. या सगळ्या गोष्टी सरकार पक्षाकडे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरुपात असल्याचं देखील वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात सांगितलं आहे. आजच्या सुनावणीत आरोपींना व्हिसीद्वारे हजर करण्यात आलं होतं.
यावेळी बोलताना उज्वल निकम म्हणाले की, संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड याने गाइड केले. हा कट दोन किंवा दोघांपेक्षा अधिक लोकांनी केलेला आहेच. पण हा कसा वाढत गेला आणि यातील आरोपी कसे दोषी आहेत. यातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचाही गुन्ह्यात सहभाग कसा आहे, याबाबत आम्ही न्यायालयाला सविस्तर माहिती आज दिली. तसंच काही महत्त्वाच्या साक्षीदारांची ओळख गोपनीय ठेवावी, अशी न्यायालयाला विनंती केली आहे आणि सर्व आरोपींची संपत्ती संघटीत गुन्हेगारी कायद्याखाली जप्त करावी, अशीही विनंती आज न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायालयात अर्ज केलेले आहेत, असंही वकील उज्वल निकम यांनी सांगितलं.