Ajit Pawar Funeral LIVE : काटेवाडी ते बारामती अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
अजित पवारांच्या पार्थिवाचे काटेवाडीतून बारामती येथील विद्या प्रतिष्ठानकडे अंत्ययात्रेसाठी प्रस्थान झाले. विमान अपघातामुळे झालेल्या त्यांच्या निधनानंतर कुटुंबीय, कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दादा परत या, अमर रहे घोषणांनी परिसर दुमदुमला. राज ठाकरे, नितीन गडकरींसह अनेक नेते त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत.
अजित पवारांच्या पार्थिवावर काटेवाडी येथून बारामतीकडे अंत्यसंस्कारासाठी अंतिम यात्रा सुरू झाली आहे. विमान अपघातात अकाली निधन झाल्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. काटेवाडी, त्यांचे जन्मगाव, येथे हजारो नागरिक, कुटुंबीय आणि कार्यकर्ते जमले होते. त्यांच्या भगिनी सुमित्रा पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबियांच्या उपस्थितीत ही अत्यंत वेदनादायी यात्रा सुरू झाली.
यावेळी दादा परत या, एकच वादा अजित दादा, अमर रहे अजित दादा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. कार्यकर्त्यांचा भावनांचा आवेग आणि अजित पवारांवरील प्रेम स्पष्ट दिसत होते. यापूर्वी ज्या रस्त्यांवरून त्यांच्या विजयी मिरवणुका निघाल्या होत्या, त्याच मार्गावरून आज त्यांची निरोपाची यात्रा जात होती.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. राज ठाकरे, नितीन गडकरी, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील यांसारखे अनेक नेते बारामतीत दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली असून पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग दर्शवला आहे. लाखो कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत.

