अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जलसा निवासस्थानाबाहेर गोळीबाराचा मोठा कट दिल्ली पोलिसांनी उधळला आहे. याप्रकरणी दीपक सिंग आणि विकास ठाकूर या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी विकास ठाकूरचे बिश्नोई गँगशी संबंध असल्याचे समोर आले असून तो अनमोल बिश्नोईला शस्त्रे पुरवत असे. सध्या या कटाच्या अधिक तपासातून अनेक नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जलसा निवासस्थानाबाहेर गोळीबाराचा कट रचण्यात आला होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हा कट उधळून लावत दोघांना अटक केली आहे. दीपक सिंग याला ठाण्यातून, तर विकास ठाकूर याला दिल्लीतून पकडण्यात आले आहे. आरोपी विकास ठाकूरचे कुख्यात बिश्नोई गँगशी संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. तो अनमोल बिश्नोईला शस्त्रे पुरवत असे.
अनमोल बिश्नोईच्या अटकेनंतर तो अनिल पंडित आणि रणदीप मलिक यांच्यासाठीही काम करत होता. दिल्ली पोलिसांनी मुंबईत बिग बींच्या बंगल्याबाहेर गोळीबाराच्या कटाची माहिती मिळाल्यानंतर विशेष ऑपरेशन राबवून आरोपींना जेरबंद केले. विकास ठाकूर जलसा बंगल्यासमोर रेकी करत होता, अशी माहिती आहे. या घटनेमुळे मुंबईतील बॉलिवूड अजूनही दहशतीच्या सावटाखाली असल्याचे स्पष्ट होत आहे. दिल्ली पोलिसांकडून दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
