राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन् सच्चा शिवसैनिक…मुख्यमंत्र्यांकडून मनोहर जोशींना श्रद्धांजली
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज दुखःद निधन झालं आहे. शुक्रवारी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, ट्वीटच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहिली
मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज दुखःद निधन झालं आहे. शुक्रवारी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, ट्वीटच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले आणि त्यांना अपेक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी मनापासून योगदान देणारे एक शिस्तबध्द आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. आज आपण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला आहे. सरांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत… भावपूर्ण श्रद्धांजली!’
पुढे त्यांनी असेही म्हटले, महाराष्ट्र, मराठी माणसाविषयी त्यांना मनापासून आत्मीयता होती. महाराष्ट्राच्या राजकारणातला अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा ही त्यांची ओळख. सर, अतिशय नम्र, संयमी, हजरजबाबी आणि शिस्तप्रिय होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील त्यांची कामगिरी, योगदान आमूलाग्र बदल घडवणारे होते. शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना तळमळ होती. त्यामुळेच कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना शिक्षणाकडे वळवले. शिवसेना – भाजप युतीच्या सरकारचे नेतृत्व सरांनी केले. सर्वांना सोबत घेऊन, भूमिकांचा आदर करून वाटचाल करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवरील कामाचा त्यांना दांडगा अनुभव होता. शिवसेनेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो.