सांगोल्याच्या जागेवरून मविआत वाद तर महायुतीत मावळच्या जागेवरून जुंपली, कोणाला मिळणार उमेदवारी?
महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून वाद निर्माण झालाय. मावळमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर आरोप केलेत तर सांगोल्यातील जागेवरून महाविकास आघाडीतच वादाची ठिणगी पडली आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही जागांवर वाद निर्माण झालाय. मविआत सांगोला तर महायुतीत मावळच्या जागेवरून चांगलीच जुंपली आहे. मविआत सांगोल्यातील जागा शेकापला सोडण्यात येणार असल्याचे शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. तर सांगोल्यातील जागा शिवसेनेची होती आणि राहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलेय. सांगोल्याची जागा मविआचा घटकपक्ष शेकापला सोडण्यात येणार असल्याचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे सांगोल्याच्या जागेवर ठाकरे गटाकडूनही दावा करण्यात आलाय. सांगोल्याची जागा मविआने न दिल्यास अपक्ष लढणार असल्याचे बाबासाहेब देशमुख यांनी म्हटलं आहे. सांगोल्यात सध्या शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे शहाजीबापू पाटील महायुतीकडून या मतदारसंघातून उमेदवार असण्याची शक्यता आहे. याचवेळी दीपक साळुखेंनी अजित पवारांची साथ सोडत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सांगोल्यातून दीपक साळुंखे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून ठाकरे गटाकडूनही उमेदवारीचे संकेत देण्यात आले आहे.