Gunaratna Sadavarte : मनोज जरांगे पाटील कोण? बॅरिस्टर आहे का? गुणरत्न सदावर्तेंचा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल
'निवडणुकांमुळे आता मनोज जरांगे यांच्याकडे गाड्या वाढतील. बुजगावणे उभे केले जातील, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देणारे विद्यार्थीही सांगतील जरांगेमुळे त्यांचं किती नुकसान झालंय'.
अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. लातूर येथे बोलत असताना गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. ‘मी जातीयवादी नाही पण मराठा आरक्षण हे आरक्षणाच्या टक्केवारीच्या बाहेर जात असल्याने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकणार नाही.’, असं स्पष्टपणे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय.
पुढे ते असेही म्हणाले, मराठा आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता सुज्ञ मराठ्यांनी समाजासोबत चर्चा केली पाहीजे. मराठा आरक्षण संविधानिक असताना ज्याप्रकारे आंदोलनं करण्याचा घाट घालण्यात आला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ येत आहे. मनोज जरांगे पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारख निवडणुकीच्या वेळेला उगवता, असं म्हणत त्यांनी जिव्हारी लागणारी टीका मनोज जरांगे पाटलांवर केली. कोण आहे मनोज जरांगे पाटील? बॅरिस्टर आहे का? मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान केलंय. मराठा समाजाला ईडब्लूएसमधील आठ टक्के आरक्षण मिळत होते. परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्के पेक्षा कमी आरक्षण मिळत आहे, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.