Amit Thackeray : थोडा संयम… ऑपरेशन सिंदूरनंतरच्या विजयावरून अमित ठाकरेंचं थेट मोदींना पत्र; नेमकं काय म्हटलं?
'‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्या शूर सैनिकांनी दाखवलेले धाडस, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रासाठीचा त्याग हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. भारतीय लष्कराने आपल्या शौर्याने संपूर्ण देशाच्या हृदयात अढळ स्थान मिळवलं आहे.'
युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, थोडा संयम बाळगावा… असं म्हणत मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र पाठवण्यात आलं आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित राष्ट्रीय सुरक्षेचे निर्णय घेतले त्याबाबत आभार मानत शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून सध्या संयम बाळगावा, असे आवाहन पत्राद्वारे केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचेही म्हणत पाकिस्तानने अनेकदा दगाफटका केला आहे, त्यामुळे नागरिकांना मार्गदर्शन आवश्यक असल्याचं मत अमित ठाकरेंनी व्यक्त केलंय. तसंच युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजय रॅली ज्या निघत आहेत त्या टाळाव्या, अशी विनंती अमित ठाकरेंकडून कऱण्यात आली आहे. ‘सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून युद्धविराम आहे आणि म्हणूनच, ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत’, असेही अमित ठाकरेंनी म्हटलंय.