IMD Weather Update : महाराष्ट्रात मान्सून कधी येणार? IMD कडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात मोठा इशारा काय?
राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. मान्सून अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर आता येत्या 27 मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. दरम्यान, अंदमानमध्ये आठ ते नऊ दिवस आणि केरळात तीन ते चार दिवस अगोदर मान्सून दाखल झाला असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली. तर महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी दाखल होणार हे आताच सांगता येणार नसल्याचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले. महाराष्ट्रात तापमान वाढल्यामुळे आणि आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस होत आहे. आता पुन्हा येत्या चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. येत्या एक ते दोन दिवसात मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पाऊस होण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.