कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
कर्जत येथील टोरेन्ट जलविद्युत प्रकल्पासाठी २२६ शेतकऱ्यांना भूसंपादनाची नोटीस बजावण्यात आली आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये संताप आहे. प्रस्तावित २५ नोव्हेंबरच्या जमिनीच्या मोजणीला शेतकरी विरोध करत आहेत, तर संजय राऊतांनी दादागिरी केल्यास गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. यापूर्वी वृक्षतोडीवरूनही वाद झाला होता.
कर्जत तालुक्यामधील टोरेन्ट जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. या प्रकल्पाच्या पोहोच रस्त्यासाठी पाच गावांमधील 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, येत्या २५ नोव्हेंबरला जमिनीची संयुक्त मोजणी करण्याचे नियोजन आहे. मात्र, या मोजणीला शेतकरी आणि भूमिपुत्रांनी तीव्र विरोध दर्शवला आहे, ज्यामुळे कर्जतमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी 7 ऑक्टोबर रोजी प्रकल्पासाठी झालेली जनसुनावणी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आली होती.
जनसुनावणी रद्द झाल्यानंतर पुन्हा कोणतीही सुनावणी न घेता थेट जमीन मोजणी कशी केली जाते, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. भालीवडी, पोटल, आंबोट, पाली, सायडोंगर या पाच गावातील शेतकऱ्यांना या नोटिसा पाठवण्यात आल्या असून, 13 सर्व्हे क्रमांकांच्या जमिनींची मोजणी होणार आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी या प्रकल्पावरून आक्रमक भूमिका घेतली असून, दादागिरी केल्यास गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे.
