मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? मिटकरी कार हल्ल्याप्रकरणात पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
अकोल्यात काही दिवसांपूर्वी मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर मनसे कार्यकर्ता जय मालोकरचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला मृत्यूचं कारण हार्टअटॅक सांगण्यात आलं होतं. मात्र पोस्टमार्टेम रिपोर्टमधून मालोकारला जबर मारहाण करण्यात आल्याचं समोर आल्यानं खळबळ उडालीय.
अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकारचा मृत्यू नव्हे तर खून झाला का, असा प्रश्न आता विचारला जातोय. कारण ज्या मालोकारच्या मृत्यूला आधी हार्टअटॅकचं कारण दिलं गेलं होतं., त्याचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचं पोस्टमार्टेम रिपोर्ट सांगतोय. दोन महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी अजित पवारांवर केलेल्या विधानावर मिटकरींनी टीका केल्यामुळे अकोल्यात मनसेनं मिटकरींची गाडी फोडली. त्यावेळी मनसे समर्थक आणि वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण जय मालोकार बाजूला उभा होता. तोडफोडीच्या काही वेळेतच मालोकारचा अटॅकमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं. मात्र त्यावेळी मनसेनंच मालोकारला मारहाण केल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला होता. दुसरीकडे तोडफोड प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी फरार झाले होते. त्याच प्रकरणाला आता नवीन वळण मिळालंय. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये म्हटलंय की जय मालोकारच्या पाठीवर, छातीवर डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाली. छातीच्या चार ते पाच बरगड्या फ्रॅक्चर होत्या. डोक्यालाही गंभीर इजा आणि मेंदूला सूज होती. मानेवरच्या मज्जातंतूना गंभीर दुखापतही झाली होती. त्यामुळे इतक्या जखमा असूनही डॉक्टरांनी मालोकारच्या मृत्यूचं कारण हार्टअटॅक का सांगितलं? डॉक्टरांवर कुणाचा दबाव होता का? असे सवाल सध्या उपस्थित होत आहे.