मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडला! मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत, कारण…
मध्य रेल्वेची वाहतूक विक्रोळीजवळ सिग्नल बिघाडामुळे मंदावली आहे. कल्याणवरून सीएसएमटीकडे जाणारी ट्रेन मुलुंड येथे अर्धा तास थांबली. मोटरमनने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक स्थानकावर गाड्या दहा मिनिटे थांबून पुढे सरकणार आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा विलंब होत असून अनेकजण अडकले आहेत.
मध्य रेल्वेची वाहतूक सध्या अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) दिशेने निघालेल्या अनेक लोकल ट्रेन मुलुंड स्थानकाजवळ तसेच ठाणे स्थानकाजवळ तब्बल अर्धा तास थांबल्या होत्या. मोटरमनने प्रवाशांना सांगितले की, विक्रोळीपर्यंत प्रत्येक स्थानकावर लोकल दहा-दहा मिनिटे थांबून पुढे जाईल. या विलंबामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. एका महिला प्रवाशाने सांगितले की, त्या लेडीज डब्यात लहान मुलांसोबत अर्ध्या तासापासून अडकल्या आहेत. मोटरमनच्या म्हणण्यानुसार, विक्रोळी आणि कांजूरमार्ग दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे, ज्यामुळे सर्व गाड्या थांबल्या आहेत.
सिग्नल फेल्युअर झाल्यामुळे तिकडे आग लागली होती, असेही कारण देण्यात आले. या बिघाडामुळे अप आणि डाउन दोन्ही मार्गांवरील लोकल सेवांवर परिणाम झाला आहे. अनेक प्रवासी गाडीतच अडकले असून, आजूबाजूला उतरण्यासाठी प्लॅटफॉर्मही उपलब्ध नाही. सिग्नल दुरूस्त होईपर्यंत गाड्या प्रत्येक सिग्नलला थांबून हळूहळू पुढे सरकणार असल्याचे मोटरमनने स्पष्ट केले. या घटनेमुळे मुंबईकरांना आज प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
