MNS : अवकाळीनं नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते थेट उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे चांदिवली मधील नाल्याची पोलखोल करण्यात आली. चांदिवली मधील नाल्यामध्ये उतरून मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नाल्यातच हॉलीबॉल खेळला.
मुंबईमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. त्यातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साकीनाका येथे असणाऱ्या एका नाल्यात उतरून हॉलीबॉल खेळत अनोखे आंदोलन करण्यात आले. साकीनाक्यातील सत्यनगर नाल्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे की त्यामध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आणि इतर पदाधिकारी उतरले आणि त्यांनी या नाल्यात हॉलीबॉल हातात घेऊन हॉलीबॉलचा खेळ खेळला. पालिका प्रशासन, कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने नालेसफाई बाबत जबाबदारीची एकमेकांकडे समस्येची फेकाफेकी करीत जबाबदारी झटकत आहे, त्याचे प्रतीक म्हणून अशा कचऱ्याने भरलेल्या नाल्यात हॉलीबॉल खेळत असल्याचे महेंद्र भानुशाली यांनी म्हटले. यासह प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि तरीदेखील प्रशासनाला जाग आली नाहीतर हाच कचरा पालिकेच्या कार्यालयात नेऊन टाकू, अशी चेतावणी मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी दिली.