काँग्रेस आमदार भारत भालकेंचं 'जाना था भाजप, पहुँच गये राष्ट्रवादी'

भारत भालके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत भालके आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

काँग्रेस आमदार भारत भालकेंचं 'जाना था भाजप, पहुँच गये राष्ट्रवादी'

सोलापूर : पंढरपूरचे काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होत्या. मात्र अचानक भारत भालकेंनी ‘डब्ल्यू’ टर्न घेत तिसऱ्याच पक्षाची (Congress MLA Bharat Bhalke in NCP) वाट धरली आहे. कमळ हाती घेता-घेता भारत भालकेंनी अचानक राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ हाती बांधण्याचा निर्धार केला आहे.

भारत भालके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत भालके आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून भालके 3 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

तेलही गेलं, तूपही जाण्याची चिन्हं, भाजपच्या वेटिंगवरील 3 आमदार स्वपक्षासाठीही परके?

काँग्रेसला अनौपचारिक रामराम ठोकल्यावरही भाजपकडून भालके (Congress MLA Bharat Bhalke in NCP) होल्डवर होते. मात्र विधानसभेच्या तोंडावर कळा असह्य झाल्याने ‘तेल-तूप’ हातून जाण्याआधीच भारत भालकेंनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेण्याचं ठरवलं. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत निवडणुकांना सामोरं जाणार असल्याने पंढरपूरच्या जागेवरुन तणातणी होण्याची शक्यता कमीच होती.

अद्याप युतीचा निर्णय झालेला नसल्यामुळे युती झाली तर शिवसेनेकडून माढा ऐवजी पंढरपूरची जागा भाजपला सुटणार का, या द्विधा मनस्थितीत आमदार भारत भालके होते. त्यामुळे ते मुंबईत तळ ठोकून होते. युतीची घोषणा झाली नसल्यामुळे भाजपच्या पक्षनेतृत्वाने भालकेंना होल्डवर ठेवलं होतं, त्यामुळे भालकेंची धाकधूक वाढली होती.

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत भालके यांच्या घरी फराळाचा आस्वाद घेतल्यानंतर भालके यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. मात्र त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर करुन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, भाजपने भालकेंना पक्षप्रवेश नाकारला असल्याचं वृत्त आहे.

कोण आहेत भारत भालके?

  • पंढरपूर- मंगळवेढ्यातून काँग्रेस आमदार भारत भालके
  • भारत भालके यांनी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीला दांडी मारली होती.
  • काँग्रेसच्या अनेक बैठकांना पाठ फिरवली
  • भारत भालकेसुद्धा भाजप प्रवेशासाठी मुंबईत तळ ठोकून होते
  • भारत भालकेंच्या प्रवेशाला भाजपमधील परिचारक गटाने मोठा विरोध केला

अक्कलकोटचे काँग्रेसचे विद्यमान आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांचाही अद्याप प्रवेश न झाल्याने ते स्वपक्षासाठीही परके होण्याची चिन्हं आहेत. त्यापैकी भालकेंनी राष्ट्रवादीचा पर्याय निवडला आहे. म्हेत्रे आणि शिंदे काय करतात, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *