गणेश नाईक होल्डवर, मुख्यमंत्र्यांचा नेमका विचार काय?

गणेश नाईक हा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील मोठा चेहरा आहे. नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासूनच गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. मात्र राष्ट्रवादीतून त्यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे

Ganesh Naik on hold, गणेश नाईक होल्डवर, मुख्यमंत्र्यांचा नेमका विचार काय?

ठाणे : राष्ट्रवादीतून भाजपच्या गोटात सामील झालेले नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांना भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत स्थान मिळालं नाही. त्यामुळे नाईक यांना होल्डवर (Ganesh Naik on hold) ठेवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नेमका विचार काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गणेश नाईक यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो विचार केला आहे. योग्य वेळी गणेश नाईक यांच्याशी मुख्यमंत्री चर्चा करतील आणि आपला निर्णय जाहीर करतील, असं उत्तर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलं. चव्हाण यांनी कोकण पट्ट्यातील भाजप उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं.

गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांना ऐरोलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र गणेश नाईक यांच्याबाबतचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे.

मंदा म्हात्रेंची नाराजी

काहीही झालं तरी बेलापूरची आमदार मीच असेन, असं मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशावेळी सांगितलं होतं. गणेश नाईक यांना पक्षात घेण्यासाठीही मंदा म्हात्रे यांचा विरोध होता. पण पक्षाकडून त्यांची समजूत घालण्यात आली. मंदा म्हात्रे यांना तिकीट कापण्याची भीती होती, मात्र पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. परंतु गणेश नाईक यांना बेलापुरातून तिकीट मिळण्याची शक्यता असताना पहिल्या यादीत (Ganesh Naik on hold) त्यांचं नाव दिसलेलं नाही.

गणेश नाईक यांचं वर्चस्व

गणेश नाईक हा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील सर्वात मोठा चेहरा आहे. 17 डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे.

नरेंद्र पवारांबाबत लवकरच निर्णय

दरम्यान, आमदार नरेंद्र पवार यांच्या नाराजीबाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो विचार करतील, असंही रवींद्र चव्हाणांनी सांगितलं.तर एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांच्याबाबत लवकरच निर्णय होईल, असं ते म्हणाले. सध्या कोकण विभागातील फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. येत्या 4 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ असल्यामुळे दोन-तीन दिवसात निर्णय होईल, असंही ते म्हणाले.

गणेश नाईकांना हिरवा कंदील

उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे तीन दिवस उरले असताना अर्जात काही चुका होऊ नयेत, याचं दडपण उमेदवारांवर असतं. चुका टाळण्यासाठी भाजपने एबी फॉर्म वाटपास वेळ न लावता रात्री उशिराच वाटप केलं.

भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत कोकण विभागातील ज्या उमेदवारांची नावं जाहीर झाली, त्यांना रात्री एबी फॉर्म वाटण्यात आले. उमेदवार दिवसभर प्रचाराच्या धामधुमीत असल्यामुळे रात्रीची वेळ निवांत असते, असं चव्हाण म्हणाले.

शिवसेनेचाही बेलापूर मतदारसंघावर दावा

ठाण्यातील खोपट परिसरात भाजप पक्ष कार्यालयात रविंद्र चव्हाण यांनी निवडणुकीत पोलिंग एजंटने काय करावं? कशाप्रकारे निवडणुकीचा अर्ज भरावा? अशा विविध तांत्रिक बाबींवर उमेदवारांना मार्गदर्शन केलं.

ठाण्याचे आमदार संजय केळकर, नवी मुंबईचे प्रशांत ठाकूर, भिवंडीचे महेश चौगुले, ऐरोलीचे संदीप नाईक, बेलापूरच्या मंदा म्हात्रे यांच्या पोलिंग एजंटकडे एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *