
खामगाव : विदर्भात दोन दिवस अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) अंदाज वर्तवण्यात आला होता, त्यानुसार आज सकाळपासूनच बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, तर खामगाव (khamgaon) तालुक्यातील आंबेटाकळी गावासह परिसरामध्ये जवळपास अर्ध्या तासापासून विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. बोरीअडगाव परिसरात तुरळक ठिकाणी गारपीट देखील होत आहे. शेतकऱ्याच्या शेतातील गहू, हरभरा हे पीक घरात आले असले तरी गारपीट आणि अवकाळी पावसाचा कांदा आणि फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आखतवाडे, बिजोटे व भडाणे परिसरात सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. अचानक आलेल्या पावसाने शेतात काढून ठेवलेल्या उन्हाळी कांद्यासह काढणी आलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. तर आंबा तसेच भाजीपाला व फळबागांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले.
पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसानं, काही गावांना चांगलच झोडपून काढलं. साधारण अर्धा तास पडलेल्या मुसळधार पावसानं आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झाले होते. यावेळी नागरिकांची पावसानं मोठी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिकाला याचा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात वादळी अवकाळी पाऊस सुरू, अचानक पडलेल्या पावसामुळे एकच धावपळ, व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे सध्या राहिलेल्या उन्हाळी मूग, कांदाबीज, उत्पादन कांदा, आंबा मोहर, नुकसान होण्याची शक्यता आहे.