
राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी लवकरच संसदेत नवीन कायदे आणले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासाठीही या कायद्यांमध्ये तरतूद असणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे. सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करणे आणि त्यांचे मध्यस्थ आणि फसवणुकीपासून संरक्षण करणे हे आहे असंही चौहान यांनी म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी, शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी संसदेत नवीन कृषी कायदे सादर केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाशी, त्यांच्या पिकांशी आणि त्यांच्या भविष्याशी छेडछाड करणे यापुढे सहन केले जाणार नाही. बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या विक्रीद्वारे शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्यांवर केंद्र सरकार निर्णायक, कठोर आणि दंडात्मक कारवाई करेल असं यावेळी चौहान यांनी म्हटले आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी छत्तीसगडमधील शेतकऱ्यांशी बोलताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य शेतकरी आणि त्यांचा विकास हे आहे. काही समाजकंटक बनावट खतांचा वापर करून शेतकऱ्यांची पिके नष्ट करत आहेत. हा एक आर्थिक गुन्हा आणि शेतकऱ्यांची फसवणूक देखील आहे. अशा लोकांवर कायदेशीर कठोर कारवाई केली जाणार आहे. याची तरतूद कृषी कायद्यांमध्ये असणार आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना फळझाडे आणि झाडे लावण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. पारंपारिक भातशेतीसोबत फळे, भाज्या आणि विविध पिके घेतल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढते यावरही त्यांनी प्रकाश टाकला. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेवर बोलताना त्यांनी या योजनेद्वारे सरकार थेट लहान शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करत असल्याचीही माहिती त्यांनी दिली.