Onion : कांद्याचा वांदा, देशातील मुख्य बाजारपेठेत 50 पैसे किलो कांदा, येवला तालुक्यातील शेतकऱ्यास निच्चांकी दराचा मान

सध्या उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरु आहे. दर नसला तरी क्षेत्र रिकामे करुन त्या ठिकाणी खरिपाची पिके घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा आहे. येवला तालुक्यातील देशमाने यांनीही याच उद्देशाने गोलटी कांद्याची काढणी केली आणि विक्रीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला. किमान मुख्य बाजारपेठेत किमान दर मिळेल असा आशावाद त्यांना होता.

Onion : कांद्याचा वांदा, देशातील मुख्य बाजारपेठेत 50 पैसे किलो कांदा, येवला तालुक्यातील शेतकऱ्यास निच्चांकी दराचा मान
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

May 20, 2022 | 9:32 AM

लासलगाव : उन्हाळी हंगामातील (Onion Rate) कांद्याचे दर पावसाळ्याच्या तोंडावर देखील वाढत नाहीत. उलट यामध्ये घसरणच सुरु आहे. (Lasalgaon Market) लासलगाव ही देशातीलीच नव्हे तर अशिया खंडातील (Onion Market) कांद्याची मुख्य बाजारपेठ असून या बाजारपेठेत गोलटी कांद्याला चक्क 50 पैसे किलो असा दर मिळाला आहे. त्यामुळे कांदा दराच्या बाबतीत किती लहरीपणाचे पीक आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला 400 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. कांदा हे नगदी पीक असले तरी यंदा लाल कांद्यानंतर सुरु झालेली घसरण आता तीन महिन्यानंतरही कायम आहे. त्यामुळे अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे.

कांदा दरात घसरण सुरुच

यंदा उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्या तुलनेत मागणी आणि दरही नाहीत. दराच्या बाबतीत कांदा पीक हे लहरी असले तरी अनेक वेळा नुकसान हे शेतकऱ्यांचेच झाले आहे. मागणीत घट झाल्याने ही अवस्था कांदा दराची झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. चांगल्या प्रतीच्या कांद्याचे सौदे तरी होतात पण दुय्यम आणि निकृष्ट दर्जाचा कांदा तर शेतकरी जागेवर सोडून जात आहेत. वाहतूकीचा खर्चही आता कांदा पिकातून निघत नसल्याने शेतकऱ्यांचा चांगलाच वांदा झाला आहे.

देशमानेंच्या गोलटी कांद्याला निच्चांकी दराचा मान

सध्या उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरु आहे. दर नसला तरी क्षेत्र रिकामे करुन त्या ठिकाणी खरिपाची पिके घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा आहे. येवला तालुक्यातील देशमाने यांनीही याच उद्देशाने गोलटी कांद्याची काढणी केली आणि विक्रीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला. किमान मुख्य बाजारपेठेत किमान दर मिळेल असा आशावाद त्यांना होता. पण 51 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाल्याने देशमाने यांनी तर डोक्यालाच हात लावला.

हे सुद्धा वाचा

उत्पादन खर्च सोडा, सर्वकाही नुकसानीतच

कांदा पिकातून पदरी काहीतरी पडेल या उद्देशाने दर हंगामात कांदा लागवड ही केली जाते. अनेक ठिकाणी नुकसान अन् फायद्याचा विचार न करता लागवड ही नित्याचीच झाली आहे. पण दरातील लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा ग्राहकांना नव्हे तर शेतकऱ्यांनाच बसला आहे. आता तर 50 पैसे किलोने कांद्याची विक्री होताना पाहवयास मिळत आहे. मुख्य बाजारपेठेत किमान दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना असते मात्र, ते देखील होताना पाहवयास मिळत नाही. आतापर्यंत विक्रमी दर मिळाल्याच्या चर्चा होत्या पण आता देशमाने यांना मिळालेल्या निच्चांकी दराची चर्चा जिल्हाभर होऊ लागली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें