वेदर स्टेशनच शेतकऱ्यांच्या मुळावर, ‘या’ एका निकषामुळे नुकसान भरपाईपासून वंचित?
नांदेड जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र वेदर स्टेशन आता या शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे.

नांदेडमध्ये शेतकऱ्यांची चांगीलच कोंडी झाली आहे. नुकसान भरपाईच्या एका निकषामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नुकसान भरपाईसाठी वाऱ्याचा वेग ताशी 40 किमी असायला हवा. मात्र त्या भागात असलेल्या वेदर स्टेशनमध्ये हा वेग तासी 38 किमी नोंदवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी हे वेदर स्टेशन चुकीचा वेग दाखवते. त्यात तांत्रिक बिघाड झालेली आहे, असा आरोप केला आहे. त्यामुळे आता चुकीची माहिती संकलित झाल्यामुळे हे वेदर स्टेशन शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
संपूर्ण नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान
नांदेड जिल्ह्यात 9 जून रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे फळबागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. विशेषत: केळी आणि पपईच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. नांदेडच्या अर्धापूर, मुदखेड व भोकर तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. वादळी वाऱ्याचा वेग जास्त असतानाही वेदर स्टेशनमध्ये केवळ ताशी 38 किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली आहे. याच कारणामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार की नाही असा प्रश्न उभा राहिला आहे.
वादळी वाऱ्याचे मोजमाप व्यवस्थित झाले नाही
जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे 4 हजार हेक्टरवरील फळबागायतींना फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे. वेदर स्टेशन चुकीच्या जागी लावल्याने वादळी वाऱ्याचे मोजमाप व्यवस्थित झाले नसल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. वेदर स्टेशन नियमानुसार लावावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने पाहणी करून वादळी वाऱ्याचा वेग ताशी 40 किलोमीटर पेक्षा अधिक असल्याचा प्रस्ताव पाठवला आहे.
पीकविमा कंपन्या कोणता निकष लावणार?
मात्र आता पिकविमा कंपन्या जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव ग्राह्य धरणार की, वेदर स्टेशनमध्ये नोंद झालेलाच वाऱ्याचा वेग ग्राह्य धरणात असा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, पावसात आमचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
