
एसयूव्ही कार भारतात नेहमीच लोकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. दरवर्षी त्यांची भरपूर विक्रीही होते. महिंद्रा स्कॉर्पिओ, टाटा सफारी, टोयोटा फॉर्च्युनर या कंपन्यांची नावे या सेगमेंटमध्ये ठळकपणे आहेत. परंतु, अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण वाढीनंतर भारतात एसयूव्ही वाहनांच्या मासिक विक्रीत प्रथमच घट झाली आहे.
जून महिन्यात ही घट झाली आहे. आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये कपात, जगभरातील अनिश्चितता आणि आर्थिक आव्हानांमुळे ही घसरण होऊ शकते. त्याविषयी सविस्तर जाणून घ्या.
‘ईटी’ला मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये SUV ची विक्री 2.1 टक्क्यांनी घटून 1,75,000 युनिटवर आली आहे. इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच SUV च्या विक्रीत मासिक घट झाल्याचे उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. यावरून असे दिसून येते की लोक आता एसयूव्ही सेगमेंटला कमी पसंती देत आहेत, विशेषत: जेव्हा कारची एकंदर मागणी आधीच मंद आहे.
SUV ने भारतात आपले स्थान मजबूत केले होते आणि विकल्या गेलेल्या एकूण वाहनांमध्ये त्यांचा वाटा सुमारे 55% आहे. यामध्ये मायक्रो SUV पासून मोठ्या SUV पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2020 ते 2025 दरम्यान एसयूव्ही विक्रीत झपाट्याने वाढ झाली होती. तथापि, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एसयूव्हीची विक्री 5.6 टक्क्यांनी वाढून 572,000 युनिट्स वर पोहोचली, जी आर्थिक वर्ष 2025 मध्ये 11.3 टक्क्यांनी वाढली होती. आर्थिक वर्ष 2022 मध्ये विक्री 42 टक्के, 2023 मध्ये 36 टक्के आणि 2024 मध्ये 27 टक्के वाढली होती. त्याचबरोबर एसयूव्हीचा वाटाही सातत्याने वाढत आहे.
आर्थिक वर्ष 2015 मध्ये एकूण प्रवासी वाहन विक्रीत एसयूव्हीचा वाटा 14.3 टक्के होता. मार्चअखेर तो वाढून 55 टक्क्यांवर गेला होता.
आर्थिक वर्ष 2020 मध्ये एकूण प्रवासी वाहनांच्या विक्रीत 18 टक्क्यांची घसरण झाली, तेव्हा एसयूव्हीची विक्री केवळ 7 टक्क्यांनी घटली. पण आता ही तफावत कमी होत चालली आहे, ज्यामुळे एसयूव्हीची विक्री मंदावण्याची शक्यता आहे.
आर्थिक अनिश्चितता, इंधनाचे वाढते दर आणि ग्राहकांची बदलती विचारसरणी ही या घसरणीची कारणे असू शकतात. जाटोच्या आकडेवारीनुसार, नॉन-लक्झरी एसयूव्हीची विक्री जूनमध्ये घटून 1,71,341 युनिट्सवर आली आहे, जी जानेवारीमध्ये 2,11,946 युनिट्स होती. याच महिन्यात सुमारे 3,660 लक्झरी एसयूव्हीची विक्री झाली.
आणखी एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, एसयूव्हीची वाढ मंदावली असली तरी एमपीव्ही (मल्टी पर्पज व्हेइकल) ची मागणी वाढत आहे. मात्र, आगामी सणासुदीचा हंगाम आणि नव्याने लाँच होणाऱ्या वाहनांच्या विक्रीत सुधारणा होईल, अशी आशा कार उत्पादकांना आहे. मारुती सुझुकी या वर्षी इलेक्ट्रिक कारसह दोन नवीन वाहने लाँच करण्याची शक्यता आहे.
या वाहनांपासून आपली विक्री वाढवता येईल, अशी कंपनीला आशा आहे. “आमच्या प्रयत्नांमुळे आर्थिक वर्ष 2023 मधील 12 टक्के वरून आर्थिक वर्ष 2024 आणि 2025 मध्ये आमचा बाजारातील हिस्सा सुमारे 21 टक्के पर्यंत वाढला आहे. 2026 या आर्थिक वर्षात आपल्या एसयूव्हीच्या विक्रीत वाढ होण्याची ही महिंद्राची अपेक्षा आहे. आपली वाढ कायम ठेवण्यासाठी कंपनी इलेक्ट्रिक एसयूव्हीसह अनेक नवीन कार लाँच करण्याची योजना आखत आहे.