
मुंबई : ऑटोक्षेत्रानं गेल्या काही वर्षात कात टाकली आहे. नवीन डिझाईनसह गाड्या बाजारात दाखल होत आहेत. एकापेक्षा एक सरस अशा गाड्या बाजारात येत आहेत. आकर्षक लूक्सची कारप्रेमींना भूरळ पडल्याशिवाय राहात नाही. सुरुवातीच्या काळात गाड्यांना स्पोक व्हील्स होते.विंटेज कारमध्ये आजही स्पोक व्हील्स पाहायला मिळतात. आता गाड्यांमध्ये स्टील व्हील्स पाहायला मिळतात आणि आता त्यात अलॉय व्हील्सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे कारप्रेमींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. स्टील व्हील्स घ्यावी की अलॉय व्हील्स घ्यावी असा प्रश्न पडत आहे. काहीजण तर गाडी खरेदी केल्यानंतर व्हील्स बदलतात. पण हा निर्णय योग्य आहे का? स्टील किंवा अलॉय व्हील्स नव्या गाड्यांच्या मॉडेलनुसार दिले जातात. एन्ट्री लेव्हल आणि कमी बजेटच्या कारमध्ये स्टील व्हील्स असतात. तर टॉप मॉडेलमध्ये अलॉय व्हील्स दिले असतात. चला जाणून घेऊयात या दोन्ही व्हील्सचे फायदे आणि तोटे..
अलॉय व्हील्स हे तुलनेने हलके असतात. याचा थेट फायदा मायलेजमध्ये होतो. त्याचबरोबर गाडी चालवताना एक वेगळीच मजा येते. तसेच अलॉय व्हील्सला गंज लागत नाही. पण यासाठी अलॉय व्हील्स चांगल्या दर्जाचे असणं गरजेचं आहे. अलॉय व्हील्समुळे गाडी अधिक आकर्षक दिसते. दुसरीकडे, अलॉय व्हील्ससाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. स्टीलच्या तुलनेत याची किंमत जास्त आहे. तसेच स्टीलच्या तुलनेत कमी मजबूत असतात. तसेच याचा दुरुस्ती खर्चही जास्त आहे.
स्टील व्हील्स अलॉय व्हील्सच्या तुलनेत स्वस्त आहेत. त्यामुळे सर्वसामन्यांच्या बजेटमध्ये बसतात. त्यामुळे स्टील व्हील्स एंट्री लेव्हल आणि बजेट कारमध्ये दिसतात. तसेच टीकाऊ असल्याने लवकर खराब होत नाहीत. तसेच स्टीलमध्ये काही खराब झाल्यास दुरुस्तीसाठी जास्त खर्च येत नाही. दुसरीकडे, स्टील व्हील्स वजन जास्त असतं. यामुळे मायलेजवर परिणाम होतो. तसेच योग्य प्रकारे देखभाल केली नाही तर गंज लागतो. गाडीचं आकर्षण अलॉय व्हील्सच्या तुलनेत कमी असते.