अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती काँग्रेस समर्थक, मोदी सरकारवर केली अनेक वेळी टीका

| Updated on: Feb 01, 2023 | 8:58 AM

अर्थमंत्र्यांचे पती द हिंदूमध्ये लिहिलेल्या लेखामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. या लेखात त्यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांवर टीका केली होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती काँग्रेस समर्थक, मोदी सरकारवर केली अनेक वेळी टीका
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या कामाचे देशातच नव्हे तर परदेशातही कौतुक होत आहे. त्या नेहमीच नवनवीन आव्हानांशी लढताना दिसतात. भारतीय जनता पक्षात काम करताना त्यांना घरात काँग्रेस विचाराच्या पती डॉ. परकला प्रभाकर (Parakala Prabhakar) यांचाही सामना करावा लागतो. डॉ. परकला प्रभाकर यांनी आपल्या लेखणीतून अनेक वेळी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. निर्मला सीतारमन आणि डॉ. परकला प्रभाकर यांची काय आहे लव्ह स्टोरी.

प्रभाकर आधी राजकारणात

परकला प्रभाकर यांचा राजकारणाशी असलेला संबंध निर्मला सीतारामन यांच्यापेक्षा खूप जुना आहे. आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील नरसापुरम येथे जन्मलेल्या प्रभाकरच्या आई आंध्र प्रदेश विधानसभेच्या सदस्य होत्या. तर त्यांचे वडील परकला शेषावताराम हे दीर्घकाळ आंध्र प्रदेश विधानसभेचे आमदार होते. 1970 आणि 1980 च्या दशकात त्यांनी सलग तीन वेळा राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले.

हे सुद्धा वाचा

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या जवळचे परकला होते. याच कारणामुळे राव जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर युथ डेव्हलपमेंटमध्ये विशेष योगदान देण्यासाठी परकला प्रभाकर यांची विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली. दरम्यान, काँग्रेस पक्षानेही त्यांना फ्रेंच कम्युनिस्ट पक्षाच्या पूर्ण अधिवेशनात पक्षाचे प्रतिनिधी म्हणून पॅरिसला पाठवले होते.

असा झाला विवाह

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना सीतारामन यांची ओळख डॉ. परकला प्रभाकर यांच्याशी झाली. दोघांचे शिक्षण सोबत झाले. 1986 साली निर्मला सीतारामन आणि डॉ. परकला प्रभाकर हे विवाहबंधनात अडकले. डॉ. परकला प्रभाकर यांनी लंडनच्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स येथून डायरेक्टरेटचे शिक्षण घेतले. उत्तम वक्ते व बुद्धिजीवी म्हणून त्यांची ख्याती सर्वत्र आहे.

मोदी सरकारवर टीका

भारतात 2019 साली आर्थिक मंदीच्या चर्चांनी जोर धरला होता. केंद्र सरकार आपल्या आर्थिक धोरणांमुळे सातत्याने टीकेचे धनी ठरत होते. याच विरोधांमध्ये केंद्रीय अर्थमंत्री यांचे पती देखील आपल्या लेखणीतून अग्रस्थानी होते. केंद्र सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी आखलेल्या धोरणांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात म्हणाले की, कोरोना संकटात वंचितांना मदत करण्याऐवजी सरकार हेडलाइन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त आहे आणि स्वतःच्या पाठीवर थाप मारत आहे.

द हिंदूमध्ये लिहिलेल्या लेखामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. या लेखात त्यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांवर टीका केली होती. नेहरूंच्या समाजवादी धोरणांवर टीका करण्याऐवजी त्यांनी नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या अर्थव्यवस्थेचा अवलंब करावा, असा सल्ला त्यांनी आपल्या लेखात दिला होता.

नायडूंसोबत केले काम

2014 ते 2018 पर्यंत, डॉ. प्रभाकर यांनी आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री-स्तरीय पोस्ट संपर्क सल्लागार म्हणून काम केले. ते स्थानिक भाषेतील वाहिन्यांवरील चालू घडामोडी आणि इतर विषयांच्या चर्चेत भाग घेतात. डॉ. परकला प्रभाकर आंध्र प्रदेशच्या प्रजा राज्यम पक्षाच्या संस्थापकांपैकी एक आहेत.

निर्मला सीतारामन भाजपात 

निर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) 2006 साली प्रवेश करत राजकीय कारर्किदीला प्रारंभ केला. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून 2010 साली सीतारामन यांची नियुक्ती करण्यात आली. नरेंद्र मोदींचा 2014 साली ऐतिहासिक विजय झाला. मोदींच्या मंत्रिमंडळात सीतारामन यांना कनिष्ठ मंत्रीपद देण्यात आले.