अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात ही मेटा आणि रिलायन्समध्ये झाली मोठी डील
मार्चच्या सुरुवातीला जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा झाला होता. या सोहळ्याला जगभरातील उद्योगपतींनी लोकांनी हजेरी लावली होती. फेसबूकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली. या दरम्यान देखील मोठी डील झाल्याची चर्चा आहे.
सोशल मीडिया कंपनी मेटा चेन्नईमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कॅम्पसमध्ये भारतातील पहिले डेटा सेंटर उघडण्याची शक्यता आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या युजर्सचा डेटा ज्यामुळे स्थानिक पातळीवर जमा होईल. मार्चमध्ये जामनगर येथे झालेल्या अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्या दरम्यान झालेल्या चर्चेनंतर मार्क झुकरबर्गने रिलायन्स सोबत करार केलाय. मेटा आता देशभरात अनेक ठिकाणी चार ते पाच नोड्स ऑपरेट करण्यास सक्षम असेल. भारताच्या सारख्या देशात यामुळे मेटा कंपनीला जलद डेटा प्रक्रिया करण्यास मदत होणार आहे.
सध्या मेटाचा भारतीय युजर्सचा डेटा सिंगापूरमधील डेटा सेंटरला पाठवला जातो. पण जर भारतात डेटा सेंटर झाले तर मेटाचा देखील खर्च वाचणार आहे. याशिवाय भारतीय युजर्सला देखील नवीन अनुभव मिळणार आहे.
मेटा आणि रिलायन्स यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. आता चेन्नईच्या अंबत्तूर औद्योगिक वसाहतीमध्ये डेटा सेंटर सुरू होणार असल्याची चर्चा आहे. रिलायन्सच्या चेन्नईच्या कॅम्पसमध्ये ॲसेट मॅनेजमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डिजिटल रियल्टी यांचे संयुक्त कॅम्पस आहे. हा कॅम्पस 10 एकर जागेत पसरला आहे आणि 100-MW IT लोड क्षमतेला समर्थन देण्यासाठी डिझाइन केलेला आहे.
भारतात अमेरिकेपेक्षा दुप्पट युजर्स
भारतात फेसबुकचे ३१४.६ दशलक्ष, इंस्टाग्रामचे ३५० दशलक्ष आणि व्हॉट्सॲपचे ४८० दशलक्ष युजर्स आहेत. भारतातील युजर्सची संख्या अमेरिकेपेक्षा जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे मेटाने जर भारतात डेटा सेंटर सुरु केले तर भारत आणि मेटा या दोघांना फायदा होणार आहे. भारतातील फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसह सर्व प्लॅटफॉर्मवरील क्लिक-टू-मेसेज जाहिरातींमधून जाहिरात कमाई सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत दुप्पट झाली आहे. भारतात सर्वाधिक युजर्स असले तरी देखील स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या कमी आहे. जी सुमारे 850 दशलक्ष असल्याची माहिती आहे.
भारताची क्षमता वाढणार
केअरएज रेटिंग्सने एका संशोधनात म्हटले आहे की, भारताच्या डेटा सेंटर उद्योगाची क्षमता पुढील तीन वर्षांत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. जागतिक डेटाची २० टक्के निर्मिती करूनही, डेटा सेंटर क्षमतेमध्ये भारताचा जागतिक वाटा केवळ ३ टक्के आहे. मेटा आणि गुगल सारख्या मोठ्या टेक कंपन्या भारतात डेटा स्टोरेज करण्याच्या विचारात हे बदलण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की अल्फाबेट इंकचे Google देशातील पहिले कॅप्टिव्ह डेटा सेंटर बांधण्यासाठी नवी मुंबईत 22.5 एकर जमीन विकत घेण्यासाठी चर्चा करत आहे.