गौतम अदानी यांचे वेतन त्यांच्या अधिकाऱ्यापेक्षांही कमी, उद्योजकांमध्ये अदानी यांच्यापेक्षा जास्त वेतन घेणारे आहेत कोण?
Gautam Adani Salary: गौतम अदानी त्यांच्या कंपनीतील अधिकाऱ्यांपेक्षा कमी वेतन घेत आहे. तसेच इतर अनेक उद्योगपतींपेक्षा त्यांचा पगार कमी आहे. अदानी ग्रुपच्या नऊ कंपन्यांची नोंदणी शेअर बाजारामध्ये झाली आहे.

Gautam Adani Salary: देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अदानी उद्योग समुहाचे चेअरमन गौतम अदानी यांचा पगार किती आहे? त्यांचा पगार त्यांच्या कंपनीतील अधिकारी आणि इतर उद्योजकांपेक्षा कमी आहे. गौतम अदानी यांनी मागील आर्थिक वर्षात म्हणजे सन 2024-25 दरम्यान एकूण 10.41 कोटी रुपये वेतन घेतले. त्यांचे हे वेतन त्यांच्या कंपनीतील काही अधिकाऱ्यांपेक्षा कमी आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
अदानी ग्रुपच्या नऊ कंपन्यांची नोंदणी शेअर बाजारामध्ये झाली आहे. त्यातील दोन कंपन्यांमधूनच ते पगार घेतात. सन 2023-24 या आर्थिक वर्षात त्यांनी 9.26 कोटी रुपये वेतन घेतले होते. आता 2024-25 दरम्यान एकूण 10.41 कोटी रुपये वेतन घेतले आहे. अदानी एंटरप्राइजेज लिमिटेडमधून त्यांनी 2024-25 मध्ये 2.26 कोटी वेतन आणि 28 लाख रुपये भत्ते घेतले. या कंपनीतून त्यांना एकूण 2.54 कोटी मिळाले. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन या कंपनीतून त्यांनी 7.87 कोटी रुपये वेतन आणि कमीशन घेतले. त्यात 1.8 कोटी रुपये पगार आणि 6.07 कोटी रुपये कमिशन आहे.
गौतम अदानीपेक्षा कोणाचा पगार जास्त
गौतम अदानी यांचे वेतन ग्रुपच्या काही कंपन्यांमधील सीईओपेक्षा कमी आहे. अदानी एंटरप्राइजेज लिमिटेडचे सीईओ विनय प्रकाश यांना 69.34 कोटी रुपये वेतन घेत आहे. तसेच रिन्यूएबल एनर्जी कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे संचालक विनीत जैन यांना 11.23 कोटी रुपये मिळतात. ग्रुपचे सीएफओ जुगेशिंदर सिंह यांना 10.4 कोटी रुपये वेतन मिळते.
परिवारात कोणाला किती पगार
गौतम अदानी यांचा मुलगा करण यांना APSEZ मधून 7.09 कोटी रुपये मिळतात. या कंपनीचे सीईओ अश्विनी गुप्ता यांना 10.34 कोटी रुपये वेतन मिळते. गौतम अदानी यांचा लहान मुलगा राजेश यांना AEL कंपनीकडून 9.87 कोटी रुपये मिळतात. त्यांचा पुतण्या प्रणव याला 7.45 कोटी तर दुसरा पुतण्या सागर हे 7.50 कोटी रुपये वेतन घेतो.
कोणत्या उद्योगपतींचा पगार जास्त
गौतम अदानी यांच्यापेक्षा इतर अनेक उद्योगपती जास्त पगार घेतात. सुनील भारती मित्तल (32.27 कोटी रुपये 2023-24), राजीव बजाज (53.75 कोटी रुपये FY24 ), पवन मुंजाल (109 कोटी रुपये FY24 ), एलअँडटीचे चेअरमन एस. एन. सुब्रमण्यन (76.25 कोटी रुपये FY25), इन्फोसिसचे सीईओ सलिल पारेख (80.62 कोटी रुपये FY25) घेतात.