एटीएममधून पैसे काढणे महागणार, ‘ही’ बँक 23 रुपये चार्ज आकारणार
खाजगी क्षेत्रातील एका प्रमुख बँकेने ट्रांजॅक्शन फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांना मोफत व्यवहाराची मर्यादा संपल्यानंतर, प्रत्येक व्यवहारावर 23 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. याचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे.

आपल्याला पैशांची गरज भासल्यास आपण तात्काळ एटीएमच्या दिशेने धाव घेतो, मात्र आता एटीएममधीन पैसे काढणे महागणार आहे. खाजगी क्षेत्रातील प्रमुख बँक असलेल्या अॅक्सिस बँकेने आता व्यवहार शुल्क (ट्रांजॅक्शन फी) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने बचत आणि ट्रस्ट खात्यांसाठीच्या टॅरिफ रचनेत बदल केला आहे, त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेला एटीएममधून पैसे काढताना जास्त शुल्क मोजावे लागणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आरबीआयच्या अधिसूचनेनंतर शुल्कात वाढ
अॅक्सिस बँकेने बचत आणि ट्रस्ट खात्यांसाठीच्या टॅरिफ रचनेत बदल केला आहे.त्याअंतर्गत एटीएमची ट्रांजॅक्शन फी वाढणार आहे. याआधी आरबीआयने एक अधिसूचना जारी केली होती, यात बँकांना मोफत व्यवहाराची मर्यादा संपल्यानंतर, प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांकडून जास्तीत जास्त 23 रुपये शुल्क आकारण्याबाबत सूचना करण्यात आली होती. त्यानुसार आता शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन शुल्क कोणत्या तारखेपासून लागू होणार?
अॅक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जुलै 2025 पासून एटीएमची ट्रांजॅक्शन फी वाढणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना मोफत व्यवहाराची मर्यादा संपल्यानंतर, प्रत्येक व्यवहारावर 23 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. कॅश रिसायकलर मशीनवर (कॅश डिपॉझिट व्यतिरिक्त) केलेल्या व्यवहारांवर देखील लागू असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे.
सध्याचे शुल्क किती आहे?
अॅक्सिस बँकेचे ग्राहक सध्या मेट्रो सिटीमध्ये एका महिन्यात 3 वेळा एटीएममधून पैसे काढू शकतात. तसेच नॉन-मेट्रो शहरांतील ग्राहक जास्तीत जास्त 5 मोफत व्यवहार करु शकतात. मात्र अॅक्सिस बँके मोफत मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर 21 रुपये शुल्क आकारते, मात्र 1 जुलैपासून हा बदल लागू झाल्यानंतर बँक प्रत्येक व्यवहारावर 23 रुपये शुल्क आकारणार आहे. आरबीआयच्या नियमांनुसार ही वाढ केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसणार आहे.
‘या’ बँकाही आकारतात अतिरिक्त शुल्क
अॅक्सिस बँकेव्यतिरिक्त एचडीएफसी बँक आणि एसबीआय कडूनही ट्रांजॅक्शन फी आकारली जाते. एचडीएफसी बँक मर्यादा संपल्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर 23 रुपये अणि इतर टॅक्स आकारते. तर एसबीआय आपल्या ग्राहकांना खास सुविधा देते. ही बँक महिनाभरात ज्या ग्राहकांच्या खात्यात सरासरी जास्त रक्कम आहे, असा ग्राहकांना एटीएमच्या शुल्कात सूट देते.
