वांद्र्यातील 11 मजली इमारत तब्बल 371 कोटींना घेतली विकत
‘AU स्मॉल फायनान्स बँक’ने ही इमारत ‘अर्थवर्थ कन्स्ट्रक्शन’कडून खरेदी केली आहे. या खरेदी व्यवहारानंतर ही इमारत आता ती AU स्मॉल फायनान्स बँकचे नवीन कॉर्पोरेट मुख्यालय होईल.

मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या जवळच असलेली ‘विश्वास’ ही 11 मजली व्यावसायिक इमारत तब्बल 371 कोटी रुपयांना विकली गेली आहे. ‘AU स्मॉल फायनान्स बँक’ने ही इमारत ‘अर्थवर्थ कन्स्ट्रक्शन’कडून खरेदी केली आहे. या खरेदी व्यवहारानंतर ही इमारत आता ती AU स्मॉल फायनान्स बँकचे नवीन कॉर्पोरेट मुख्यालय होणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
मंगळवारी या खरेदीची नोंद झाली असून त्यासाठी तब्बल 22.26 कोटी मुद्रांक शुल्क अर्थात रजिस्ट्रेशन फी भरली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘युनायटेड फॉस्फरस लिमिटेड’ने ही याआधी विश्वास ही इमारत 10 वर्षांच्या भाडेकरारावर घेतली होती. मात्र मागील वर्षी हा करार संपल्यानंतर त्या कंपनीने इमारत रिकामी केली होती. आता AU स्मॉल फायनान्स बँकेने ही इमारत विकत घेतली असून लवकरच बँकेचे या इमारतीतील कामकाज सुरू होईल. या मोठ्या व्यवहारामुळे वांद्रे परिसरातील व्यावसायिक मालमत्तेच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जयपूरमध्ये मुख्यालय असलेल्या AU स्मॉल फायनान्स बँकेने मुंबईत कॉर्पोरेट कार्यालय स्थापन करण्यासाठी 74,577 चौरस फूट जागेवर पसरलेली ही इमारत विकत घेतली असून या इमारतीत 2 बेसमेंट्सही आहेत. त्यासाठी 22 कोटींची रजिस्ट्रेशन फी भरण्यात आली. या स्वतंत्र व्यावसायिक टॉवरमध्ये त्याच्या दोन बेसमेंटमध्ये एकूण 98 कार पार्किंग स्लॉट्स आहेत.
सध्या बहुतेक वित्तीय संस्था (financial institutions) दीर्घकालीन भाडेपट्ट्यांद्वारे कार्यालयीन जागा करारावर घेत असताना ही इमारत विकत घेण्यात आली असून त्याच पार्श्वभूमीवर हा थेट करार महत्त्वाचा आहे. दरम्यान मार्च अखेर संपलेल्या वर्षात, या सूचीबद्ध बँकेने निव्वळ नफ्यात 32% वाढ नोंदवली आहे, ती एकूण 2,106 कोटी रुपये आहे. एकूण 21 राज्यं आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2 हजार 456 हून अधिक बँकिंग टच पॉइंट्सचे नेटवर्क आहे आणिबँकेचे एकूण 50,900 हून अधिक कर्मचारी आहेत.
भारतीय ऑफिस प्रॉपर्टी मार्केटने अलिकडच्या वर्षांत उल्लेखनीय वाढ अनुभवली आहे. मजबूत अर्थव्यवस्था आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून वाढती मागणी यामुळे त्याला चालना मिळाली आहे. या वाढीचे श्रेय अनेक घटकांना देता येऊ शकते, ज्यामध्ये आर्थिक क्रियाकलापांमध्ये सतत वाढ, भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार आणि भरभराट होत असलेली स्टार्टअप इकोसिस्टम यांचा समावेश आहे.
