RBI Repo Rate : आता खुशाल काढा कर्ज! आरबीआयचे मोठे गिफ्ट, रेपो दरात पुन्हा मोठी कपात
RBI Repo Rate : भारतीय केंद्रीय बँकेने ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोट्यवधी भारतीयांना मोठा दिलासा दिला. आरबीआयने रेपो दरात कपातीची घोषणा केली. त्यामुळे कार, घराचा ईएमआय पुन्हा कमी होणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोट्यवधी भारतीयांना मोठे गिफ्ट दिले आहे. आरबीआयने रेपो दरात तिसऱ्यांदा कपातीची घोषणा केली. त्यामुळे कार, घराचा ईएमआय कमी होणार आहे. RBI ने व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात केली. त्यामुळे रेपो रेट आता 5.5 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जावरील व्याजदरात पुन्हा मोठी कपात होणार आहे. आरबीय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी हे पद स्वीकारल्यापासून सलग तिसऱ्यांदा भारतीय ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
रेपो दर 5.5 टक्क्यांवर
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आज सकाळी 10 वाजता रेपो रेट जाहीर केले. त्यानुसार, सलग तिसऱ्यावेळी व्याजदरात कपात केली. 56 महिन्यानंतर ही तिसरी कपात दिसून आली. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जासह इतर कर्जावरील व्याजदरात मोठी कपात झाली. त्याचा फायदा आता रिअल इस्टेट आणि वाहन बाजाराला होईल. गेल्या काही दिवसांपासून हे क्षेत्र मंदीशी सामना करत होते.
आरबीआयने 2025 पासून सुरू केलेल्या रेपो दर कपातीचे मिशन सुरूच आहे. यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिल 2025 महिन्यात रेपो दरात 0.25-0.25 टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 वरून 6 टक्क्यांवर आला होता. आता त्यात 0.50 टक्क्यांची कपात झाल्याने रेपो दर 5.5 टक्क्यांवर आला आहे.
रेपो दर कायम ठेवण्याचा विक्रम
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीने यापूर्वी रेपो दर कायम ठेवण्याचा विक्रम केला होता. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2023 पासून रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचे धोरण गेल्यावर्षी डिसेंबर 2024 पर्यंत कायम ठेवले होते. त्यानंतर संजय मल्होत्रा यांच्या हातात सूत्र येताच पहिल्यांदाच दिलासा मिळाला होता. 9 एप्रिल 2025 रोजी दुसऱ्यांदा व्याज दर कपातीचा निर्णय जाहीर झाला होता. तोच कित्ता आज 6 जून 2025 रोजी कायम ठेवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस 4 ते 6 डिसेंबर 2024 दरम्यान जैसलमेर येथे पतधोरण समितीची बैठक झाली होती. दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय 4 विरुद्ध 2 या मताने त्यावेळी घेण्यात आला होता.
