Home Loan : आनंदवार्ता, कमी होणार घराचा हप्ता, गृहकर्जावरील व्याज दरात SBI सह दोन बँकांची मोठी कपात
Home Loan Interest Rate Cut : देशातील बड्या बँकांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला. स्टेट बँक ऑफ इंडियासह इतर दोन बँकांनी गृहकर्जासह इतर कर्जावरील व्याजदरात कपातीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावरील ताण कमी होईल.

गृहकर्ज, वाहन कर्जासह इतर कर्ज घेणार्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील बड्या बँकांनी ग्राहकांना स्वस्तात कर्ज देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या ग्राहकांना आता स्वस्तात कर्ज मिळेल. तर यापूर्वी कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा व्याजाचा हप्ता कमी होईल. त्यांच्या खिशावरील ताण कमी होईल. त्यामुळे रिअल इस्टेटसह वाहन बाजाराला मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२५ बेसिक पॉईंटची कपात
स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या तिनही बँकांनी त्यांच्या कर्ज दरात २५ बेसिक पॉईंटची कपात केली आहे. याविषयीचा निर्णय या बँकांनी घेतला आहे. गेल्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कपातीचा निर्णय घेतला. जागतिक बाजारातील परिस्थिती आणि महागाईचा आलेख कमी झाल्याचा परिणाम रेपो दरांवर दिसून आला. फेब्रुवारीपासून ही दुसऱ्यांदा रेपो दरातील कपात आहे. त्यामुळे ग्राहकांना आता फायदा झाला आहे.




व्याजदर कपातीचा फायदा
या नवीन निर्णयामुळे एसबीआयचा रेपो लिंक्ड लेडिंग दर आता ८.२५ टक्क्यांपर्यंत कमी होईल. एसबीआयने बाह्य बेंचमार्क आधारीत लेंडिंग दर याच फरकाने ८.६५ टक्क्यांपर्यंत कमी केलाआहे. बँक ऑफ इंडियाने सुद्धा अशीच कपात जाहीर केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या या व्याज दर कपातीमुळे ग्राहकांना मोठा फायदा होईल. यामुळे गृहकर्जाचा वार्षिक दर आता ७.९ टक्के असेल.
फेब्रुवारी महिन्यानंतर ९ एप्रिल रोजी आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दरात ०.२५ बेसिस पॉईंट्सने कमी केले होते. ही गेल्या दोन महिन्यातील सलग दुसरी कपात आहे. गेल्या दोन महिन्यात रेपो दरात ५० बेसिस पॉईंटची कपात झाली आहे. त्यामुळे आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या गृहकर्ज, वाहन कर्जावरील व्याजदरात कपातीचा फायदा होईल. तर मालमत्तेवरील कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि इतर कर्जावरील हप्ता कमी होईल.