अनिल अंबानींसाठी अच्छे दिन, मुंबई मेट्रोसंदर्भातील हा खटला जिंकला, मिळणार ₹1,169 कोटी रुपयांची भरपाई
मुंबई उच्च न्यायालयाने एमएमओपीएलचा दावा योग्य ठरवत नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. त्यामुळे एमएमआरडीएला १ हजार १६९ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. अनिल अंबानींसाठी ही बाब दिलासा देणारी आहे.

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांच्यासाठी पुन्हा एक चांगली बातमी आहे. गेल्या काही आठवड्यापासून त्यांच्या कंपन्यांच्या शेअरकडून चांगली कामगिरी होत आहे. आता त्यांना कायदेशीर लढाईतसुद्धा यश मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो वन प्राइव्हेट लिमिटेडच्या (MMOPL) बाजूने निकाल दिला आहे. एमएमओपीएल रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरची एक सब्सिडियरी कंपनी आहे. कोर्टाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (MMRDA) आदेश दिले की MMOPL ला ₹१,१६९ कोटी रुपयांची भरपाई देण्यात यावी.
मुंबई मेट्रो लाईन १ वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर असा होता. जो सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर बांधण्यात आला होता. हा प्रकल्प एमएमओपीएलने विकसित केला आणि चालवत आहे. ज्यामध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा मोठा वाटा आहे. प्रकल्पाची किंमत आणि देयके याबाबत एमएमआरडीए आणि रिलायन्स ग्रुपमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होता. एमएमओपीएलने दावा केला होता की त्यांनी प्रकल्पात बरीच गुंतवणूक केली होती. परंतु अपेक्षित रक्कम दिली गेली नाही. यामुळे कंपनीने न्यायालयात धाव घेतली.
मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई उच्च न्यायालयाने एमएमओपीएलचा दावा योग्य ठरवत नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. त्यामुळे एमएमआरडीएला १ हजार १६९ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. न्यायालयाने हे ही स्पष्ट केले की, भरपाई कायदेशीर अटींप्रमाणे योग्य आहे. यामुळे अनिल अंबानी यांचा मोठा विजय मानला जात आहे.
अनिल अंबानी हे गेल्या काही वर्षांत आर्थिक अडचणीत होते. आता न्यायालयाकडून आलेल्या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे कंपनीची आर्थिक परिस्थिती अधिक चांगली होणार आहे. एमएमओपीएल रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर आणि एमएमआरडीएचे एक जॉइंट व्हेंचर आहे. या व्हेंचरकडूनच वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर कॉरिडोर मुंबईतील पहिला मेट्रो प्रकल्प सुरु करण्यात आला. रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरकडे ७४ टक्के तर उर्वरित शेअर एमएमआरडीएकडे आहे. अनिल अंबानी यांच्या उद्योगात अनेक उतार चढाव आले होते. २००८ मध्ये ४२ अब्ज डॉलर संपत्तीसोबत ते जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. परंतु २०२० मध्ये त्यांनी यूकेमधील न्यायालयात दिवाळखोरी जाहीर केली होती.
