Patanjali: पतंजली फूड्सच्या निकालाबाबत मोठी अपडेट, कंपनी ‘या’ दिवशी निकाल जाहीर करणार
पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीने 30 जून 2025 रोजी संपलेल्या तिमाहीच्या निकालांच्या घोषणेबाबत महत्वाची माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रामदेव बाबा यांची पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच आता कंपनीने 30 जून 2025 रोजी संपलेल्या तिमाहीच्या निकालांच्या घोषणेबाबत महत्वाची माहिती दिली आहे. कंपनीने गुरुवार, 14 ऑगस्ट 2025 रोजी त्यांचे पहिले तिमाही (Q1) आर्थिक निकाल जाहीर करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले की, 14 ऑगस्ट रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये पहिल्या तिमाहीच्या आर्थिक निकालांवर चर्चा करून ते जाहीर केले जातील.
निकालांनंतर ट्रेडिंग विंडो बंद राहणार
पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीने सांगितले की पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ट्रेडिंग विंडो 48 तासांसाठी बंद राहणार आहे. या काळात कोणताही व्यक्ती शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकणार नाही. हा नियम सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) इनसाइडर ट्रेडिंग प्रोहिबिशन रेग्युलेशन्स, 2015 आणि कंपनीच्या आचारसंहितेनुसार लागू करण्यात आला आहे.
शेअरधारकांना बोनस शेअर्स मिळण्याची शक्यता
पतंजली फूड्स कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने 17 जुलै 2025 म्हटले होते की संचालक मंडळाने गुंतवणूकदारांना 2:1 बोनस शेअर्स देण्याच्या करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे कंपनीचा 1 शेअर असेल, तर तुम्हाला त्या बदल्यात 2 अतिरिक्त शेअर्स मोफत दिले जाणार आहेत. मात्र बोनस शेअर्सची तारीख कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही.
चौथ्या तिमाहीतील नफा वाढला
पतंजली फूड्सला मार्चअखेरीस चांगला फायदा झालेला आहे. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 76.3 % ने वाढून 358.5 कोटी रुपये झाला आहे. हा नफा गेल्या वर्षी याच कालावधीत 206.3 कोटी रुपये होता. त्याचबरोबर कंपनीचा महसूल 17.8 % ने वाढून 9692.2 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा EBITDA देखील उत्कृष्ट होता, जो गेल्या वर्षीच्या 376.5 कोटी रुपयांवरून 37.1 टक्क्यांनी वाढून 516.2 कोटी रुपये झाला आहे. खर्चावर चांगले नियंत्रण असल्यामुळे कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन देखील 4.6 % वरून 5.3 % पर्यंत वाढले असल्याची माहिती समोर आली आहे.
