अरुण जेटलींची अमेरिकेत शस्त्रक्रिया, पियुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालय

अरुण जेटलींची अमेरिकेत शस्त्रक्रिया, पियुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालय

नवी दिल्ली: अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, देशाचा अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त भार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सर झाल्याने त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरु आहेत. न्यूयॉर्कमध्ये जेटलींवर शस्त्रक्रिया झाली. त्यांना दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प आता पियुष गोयलच सादर करणार हे जवळपास निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच सल्ल्याने अर्थमंत्रालयाचा भार गोयल यांच्याकडे दिल्याचं सांगण्यात येत आहे.

भाजपप्रणित एनडीए सरकारला 1 फेब्रुवारीला आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करायचा आहे. मात्र देशाचे नियमित अर्थमंत्रीच आजारी असल्याने अर्थमंत्रालयाचा भार गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला. जेटली बरे होऊन परततील तेव्हा त्यांना पुन्हा अर्थमंत्रालय सोपवलं जाईल.

गेल्या वर्षी 14 मे 2018 रोजी जेटली यांची किडनी प्रत्यारोपण झाली होती. गेल्या 9 महिन्यांपासून त्यांनी एकही परदेश दौरा केला नव्हता. गेल्या वर्षी अरुण जेटली यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांचं डायलसिस करण्यात आलं होतं. जेटलींच्या अनुपस्थितीत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी त्यावेळी अर्थमंत्रालयाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर जेटली पुन्हा 23 ऑगस्ट 2018 पासून अर्थमंत्रालयाचा कार्यभार पाहू लागले.

अरुण जेटली यांचं ऑपरेशन
अरुण जेटली यांच्यावर मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 66 वर्षीय अरुण जेटली 13 जानेवारीला अमेरिकेला गेले. जेटली यांना ‘सॉफ्ट टिश्यू’ अर्थात पेशींचा कर्करोग असल्याचं निदान झालं. परदेशात उपचार घेत असले तरी अरुण जेटली सोशल मीडियावरुन देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असतात.

संबंधित बातम्या 

अर्थसंकल्पापूर्वी धक्का, अर्थमंत्री अरुण जेटलींना कॅन्सरचं निदान    

अरुण जेटली बजेटपूर्वी उपचारासाठी अमेरिकेला रवाना   

यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता  

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकार षटकाराच्या तयारीत  

आता पाच लाखांपर्यंत शून्य टॅक्स?  

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI