INS सुमित्रावरुन मोदींचा अक्षय कुमारसोबत फेरफटका, काँग्रेसचा दावा

INS सुमित्रावरुन मोदींचा अक्षय कुमारसोबत फेरफटका, काँग्रेसचा दावा

नवी दिल्ली : INS विराट युद्धजहाजावर सुरु झालेले वाकयुद्ध चांगलेच पेटले आहे. काँग्रेसच्या नेत्या दिव्या स्पंदना यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला INS सुमित्रावर नेल्याचा फोटो ट्विट केला आहे. तसेच तुम्ही कॅनडीयन नागरिकाला युद्धजहाजावर नेले हे योग्य होते का? असा थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला.

काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रभारी दिव्या स्पंदना यांनी पंतप्रधान मोदींनाही आपल्या ट्विटमध्ये टॅग केले आहे. स्पंदना म्हणाल्या, “तुम्ही कॅनडाचा नागरिक अक्षय कुमारला तुमच्यासोबत आयएनएस सुमित्रावर घेऊन जाता. हे योग्य आहे का?” स्पंदना यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘सबसे बडा झूठा मोदी’ हा हॅशटॅग वापरत मोदींना लक्ष्य केले.

‘विशाखापट्टनममधील सैन्याच्या मोठ्या कार्यक्रमात अक्षय कुमार कुटुंबासह हजर’

दरम्यान, अक्षय कुमारने त्याच्या नागरिकत्वावर सुरु असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट करत त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याचे कबुल केले होते. स्पंदना यांनी आपल्या ट्विटसोबत एक लेखही जोडला आहे. त्यात 2016 मध्ये विशाखापट्टनममध्ये सैन्याच्या मोठ्या कार्यक्रमात अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, त्यांचा मुलगा आरव आणि कंगणा राणावत यांना प्रवेश दिल्यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘अक्षय कुमारने आईएनएस (INS) सुमित्रा युद्धजहाज चालवले’

या लेखात म्हटले आहे, “अक्षय कुमार या कार्यक्रमात फक्त हजरच नव्हता, तर त्याने राष्ट्रपतींसाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष आईएनएस (INS) सुमित्रा युद्धजहाज चालवले देखील होते. यावेळी जहाजावर अन्य नौदलाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि अतिविशिष्ट पाहुणेही हजर होते.

‘अमिताभ बच्चन यांनी INS विराटबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी’

स्पंदना यांनी आपल्या अन्य एका ट्विटमध्ये बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना त्यांची INS विराटबाबतच्या वादावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका अहवालाचा आधार घेतला आहे. त्यात लक्षद्विपचे तत्कालीन प्रशासक वजाहत हबीबुल्लाह यांनी पंतप्रधान मोदींचे दावे फेटाळले आहेत. तसेच कोणतीही शंका असेल तर त्याबाबत बच्चन यांना विचारायला हवे, असे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी काय आरोप केले होते?

“1987 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधींनी 10 दिवसांच्या सहलीसाठी बेटावर जाताना आयएनएस विराट या युद्धजहाजाचा टॅक्सीप्रमाणे उपयोग केला. त्यांनी परदेशी नागरिकांना युद्धजहाजावर नेऊन देशाच्या सुरक्षेला धोका पोहचवला.”

संबंधित बातम्या : 

INS विराटवर राजीव गांधींसोबत हजर असलेले अॅडमिरल एल. रामदास काय म्हणाले? 

खरंच ‘INS विराट’चा राजीव गांधींनी टॅक्सीसारखा वापर केला होता?


Published On - 1:42 pm, Fri, 10 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI