नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) आज जून महिन्याचा पतधोरण आढावा जाहीर करण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार आज पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. रेपो रेट वाढल्यास त्याचा परिणाम थेट कर्जावर होणार असून, कर्ज महाग होणार आहे. तसेच ईएमआयमध्ये देखील वाढ होणार आहे. सध्या देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. आरबीआय महागाई कमी करण्यासाठी रेपो रेटमध्ये पुन्हा एकदा वाढ करू शकते. यापूर्वी गेल्या महिन्यात आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 0.4 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. मात्र आज रेपो रेटमध्ये वाढ झाल्यास किती होणार याबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत दिसून येत नाहीये. नुकतीच पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात करण्यात आली आहे. अबकारी करात कपात करण्यात आल्याने पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले त्यामुळे महागाईपासून थोडा दिसाला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर रेपो रेटमध्ये (Repo rate) 0.4 टक्क्यांपेक्षा कमीच वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.