Share Market : शेअर बाजारात हे झाले काय? काल धमाल, आज धडाम, गुंतवणूकदारांचा आनंद हिरावला
Share Market Down : काल शेअर बाजाराने ऐतिहासिक उच्चांकी कामगिरी केली होती. त्यामुळे बाजारात चैतन्य पसरले होते. तर आज शेअर बाजाराने अचानक युटर्न घेतला. त्यामुळे गुंतवणूकदारांना शॉक बसला. बाजार जवळपास 900 अंकांनी घसरला.

शेअर बाजाराने काल कमाल दाखवली तर आज शेअर बाजारात धूम धडाम झाले. सोमवारी शेअर बाजाराने ऐतिहासिक झेप घेतली होती. तर मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसली. बीएसई सेन्सेक्सवर सकाळी 9.30 वाजता 701.87 अंकांची घसरण झाली आणि सेन्सेक्स 81,728.03 अंकांवर आला. त्यानंतर सेन्सेक्समध्ये जवळपास 900 अंकांची घसरण झाली. तर एनएसई निफ्टी 50 मध्ये 200 अंकांची घसरण झाली. निफ्टी घसरून 24,700 अंकांच्या जवळपास पोहचला. इन्फोसिसच्या शेअरमध्ये जवळपास 2 टक्क्यांची घसरण दिसली. इतरही अनेक कंपन्यांना सूर गवसला नाही.
एक दिवसापूर्वी मोठी उसळी
यापूर्वी सोमवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध विरामाचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसला. सेन्सेक्सने 2975.43 अंकांची ऐतिहासिक भरारी घेतली. तो गेल्या सात महिन्यातील 82,429.90 उच्चांकावर बंद झाला. तर एनएसई निफ्टी 916.70 अंकांनी वधारला होता. 3.82 टक्क्यांच्या उसळीसह निफ्टी 24,924.70 अंकावर बंद झाला. चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापारी मतभेद कमी झाल्याने बाजाराने चांगले संकेत दिले होते. सोमवारी आयटी, मेटल आणि इतर शेअरमध्ये तुफान तेजी दिसून आली होती. गुंतवणूकदारांनी शेअर खरेदी केली होती. त्यापूर्वी दोन्ही निर्देशाकांनी गेल्या वर्षी 3 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक दिवस अगोदर सर्वाधिक वाढ नोंदवली होती. त्यावेळी सेन्सेक्स 2,507.45 अंकांनी वधारला होता. तर निफ्टी 733.20 अंकांनी उसळला होता.




परदेशी गुंतवणूकदारांनी दिली उभारी
जिओजीत इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे रिसर्च चीफ विनोद नायर यांच्या मते सकारात्मक भू राजकीय आणि आर्थिक घटनांमुळे गेल्या काही दिवसात सर्वात मोठी तेजी दिसून आली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजाराला चांगलीच उभारी दिली. त्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी केल्याने बाजारात तेजीचे सत्र दिसून आले.
तर रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे रिसर्च डिप्टी हेड अजित मिश्रा यांनी अमेरिका-चीनमधील व्यापारी कराराबाबतच्या सकारात्मक धोरणाचा परिणाम दिसून आल्याचे म्हटले आहे. यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक वाढली. गुंतवणूकदारांचा विश्वास अजून मजबूत झाला. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांनी एकमेकांवर लावलेले अधिक टॅरिफला 90 दिवसांसाठी ब्रेक लावला आहे. तर अमेरिकेने चीनच्या वस्तुंवरील शुल्क 145 टक्क्यांहून कमी करत 30 टक्क्यांवर आणण्यासाठी सहमती दर्शवली आहे. तर चीनने अमेरिकन वस्तूंवरील शुल्क 125 टक्क्यांहून कमी करत 10 टक्के करण्याची घोषणा केली. त्याचा काल बाजारावर थेट परिणाम दिसून आला होता.