Share Market: भांडवली बाजार पुन्हा गडगडला; सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला

अमेरिका आणि आशियाई शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा फटका सेन्सेक्स आणि निफ्टीला बसला. | Sensex nifty share market

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:53 AM, 26 Feb 2021
Share Market:  भांडवली बाजार पुन्हा गडगडला; सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला

मुंबई: भारतीय भांडवली बाजारात (Share Market) शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक वातावरणाचा परिणामामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक गडगडले. सकाळच्या सत्रात बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स जवळपास 1000 अंकांनी खाली घसरून 50 हजाराच्या पातळीवर आला. तर निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली असून निफ्टी सध्या 14800 च्या पातळीवर आहे. (Share Marke Sensex and Nifty plunges)

या घसरणीमुळे भारती एअरटेलचा अपवाद वगळता जवळपास सर्व कंपन्यांच्या समभागांना फटका बसला. बँकिंग क्षेत्रात आयसीआयसीआय, एचडीएफसी बँकेच्या समभागांची किंमत सर्वाधिक घसरली. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभागही गडगडला.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे फटका

अमेरिका आणि आशियाई शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा फटका सेन्सेक्स आणि निफ्टीला बसला. अमेरिकेच्या नॅसडॅकमध्ये गेल्या चार महिन्यांतील सर्वोच्च घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रामुख्याने आयटी कंपन्यांच्या समभागांना मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियातही शेअर बाजाराचा निर्देशांक दोन टक्क्यांनी घसरला. जपानचा शेअर बाजार 1.8 टक्क्यांनी गडगडला तर हाँगकाँगच्या शेअर बाजारामध्येही 1.69 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली.

…तर शेअर मार्केट आणखी पडणार

आंतरराष्ट्रीय स्तरावरील नकारात्मक वातावरणामुळे खाली पडलेल्या भारतीय शेअर बाजाराला आणखी फटका बसण्याची शक्यता आहे. आज तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी जाहीर होणार आहे. या तिमाहीत खराब कामगिरी झाली असल्यास त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटतील. परंतु, जाणकारांच्या अंदाजानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत जीडीपीची वाढ आधीच्या दोन तिमाहीपेक्षा चांगली असेल. त्यामुळे शेअर बाजार सावरण्याची शक्यता आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींची परिणाम कायम राहिल्यास जीडीपी वाढल्याचाही फारसा फायदा होणार नाही.

संबंधित बातम्या:

Petrol-Diesel Price | दिलासा… सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, जाणून घ्या आजचे दर

(Share Marke Sensex and Nifty plunges)