एटीएममध्ये अडकलेले पैसे खात्यावर येईपर्यंत बँक दररोज 100 रुपये देणार

एटीएममध्ये अडकलेले पैसे खात्यावर येईपर्यंत बँक दररोज 100 रुपये देणार

मुंबई : सध्या डिजीटल युग आणि तंत्रज्ञानात वाढ झाल्याने आपल्या बँकिंग क्षेत्रातील कामं सोपी झाली आहेत. तरीही अनेकदा ग्राहकांना एटीएम मशीनबाबतच्या समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याचदा ग्राहक बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेजही येतो. पण पैसे एटीएममधून मिळत नाहीत. अशावेळी ग्राहकाला वाट बघण्याशिवाय पर्याय नसतो आणि यामुळे त्याचा वेळही वाया जातो. मात्र आता तुमचा वेळ वाया जाणार नाही. कारण या बदल्यात बँक तुम्हाला भरपाई देणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) एक नियम तयार केला आहे. नियमानुसार, जितके दिवस पैसे येणार नाही, तितके दिवस बँक तुम्हाला भरपाई म्हणून 100 रुपये देणार आहे.

यासाठी तुम्हाला काय करावे लागेल?

एक बँकेचा ग्राहक म्हणून तुम्हाला तुमचे डेबिट कार्ड देणाऱ्या बँकेकडे तक्रार दाखल करावी लागेल. तुमचे ट्रान्झॅक्शन तुमच्या बँकेच्या एटीएममधून अथवा इतर बँकेच्या एटीएम मशीनमधून फेल झाले असेल, तर तुम्ही तुमच्या बँकेत तक्रार दाखल करुन भरपाई घेऊ शकता.

आरबीआयचे नियम?

तुमचे पैसे तुमच्या खात्यात तुम्हाला मिळाले पाहिजे यासाठी आरबीआयने वेळेची मर्यादा ठेवली आहे. मे 2011 मध्ये आरबीआयने तयार केलेल्या नियमांनुसार, अशा प्रकारची तक्रार बँकेत आल्यास बँकेचे त्या दिवसाचे कामकाज संपण्याआधी ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा करावे लागणार आहेत.

काय करावं लागले?

  • बँकेकडून भरपाई घेण्यासाठी तुम्हाला ट्रान्झॅक्शन फेल झाल्यानंतर 30 दिवसांमध्ये तक्रार दाखल करावी लागेल.
  • तुम्हाला ट्रान्झॅक्शनची पावती किंवा अकाऊंट स्टेटमेंटसोबत तक्रार दाखल करावी लागेल.
  • तुम्हाला बँकेच्या अधिकृत कर्माचाऱ्याला तुमच्या एटीएम कार्डची माहिती द्यावी लागेल.
  • 7 दिवसाच्या आत जर पैसे पुन्हा खात्यात आले नाही, तर तुम्हाला अॅनेक्झर-5 फॉर्म भरावा लागेल.
  • ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म भरणार त्यादिवसांपासून तुमची भरपाई सुरु होईल.

पैसे परत करण्यासोबत भरपाईही मिळणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे स्पष्ट नियम आहेत की, बँकेला भरपाई रक्कम स्वत: ग्राहकाच्या खात्यात टाकावी लागेल. यासाठी ग्राहकाकडून दावा करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे ज्या दिवशी फेल झालेल्या ट्रान्झॅक्शनचे पैसे मिळतील त्याच दिवशी भरपाईचेही पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.

दिवसाला 100 रुपये

नियमानुसार, जर बँकेने तक्रार केल्यानंतर 7 दिवसांमध्ये पैसे दिले नाही, तर प्रत्येक दिवशी भरपाई म्हणून ग्राहकाला 100 रुपये द्यावे लागणार आहेत. जर बँकेने तुम्हाला वेळेत पैसे दिले नाही, तर तुम्हाला बँकेकडून भरपाई वसूल करण्याचा अधिकार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *