Share Market Crash : भारतीय शेअर बाजार कोसळला, अमेरिकेच्या या एका निर्णयाने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
Indian Share Market Crash : अमेरिकेतील एका निर्णयाने भारतीय शेअर बाजारावर वज्र प्रहार केला. गुरुवारी शेअर बाजार कोसळला. शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण दिसली. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपातीचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम दिसून आला.

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेच्या शेअर बाजारात घसरणीची लाट आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर आज दिसला. भारतीय शेअर मार्केट पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडला. अमेरिकेन केंद्रीय बँक, फेड रिझर्व्हने व्याजदरात कपातीचा निर्णय जाहीर केला. त्याचा परिणाम तिथल्या शेअर बाजारावर दिसला. फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात 0.25 टक्क्यांच्या कपातीचा निर्णय घेतला. सातत्याने तिसऱ्यांदा कपातीचे धोरण राबवण्यात आले आहे. त्यामुळे बाजाराचा मूड बिघडला. जागतिक बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला. एकीकडे भारतात व्याजदरात कपातीची ओरड होत असताना गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यात कोणताही बदल केलेला नाही. तर दुसरीकडे अमेरिकन बँकेने व्याजदर कपात करताच शेअर बाजाराने त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार मात्र बुचकाळ्यात पडले आहे. तर या घसरणीमागील भावना काय ते समजून घेऊयात…
सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण
गुरूवारी सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 900 अंकांहून अधिकने घसरला तर निफ्टी 321 अंकांनी घसरला. अमेरिकन केंद्रीय बँक पुन्हा व्याजदर कपात करणार हे निश्चित होते. बँकेने 0.25 टक्क्यांची कपात केली. त्याचा जागतिक बाजारावर परिणाम दिसून आला. तर भारतीय शेअर बाजार सुद्धा आपटला. अमेरिकेन फेडने पुढील वर्षात 2025 मध्ये केवळ दोन टक्के व्याजदराचे संकेत दिले आहे. त्याचा थेट परिणाम शेअर मार्केटवर दिसला. सेन्सेक्स घसरून 79000 अंकावर आला. तर निफ्टी घसरणीनंतर 23900 अंकावर आला. 10 वाजता बीएसई सेन्सेक्स 79,369.26 अंकावर व्यापार करत आहे. तर Nifty 50 सध्या 23,948.35 अंकावर व्यापार करत आहे. FMCG सोडून इतर सर्व इंडेक्स 2 टक्के घसरले आहे. तर एफएमसीजीचा निफ्टी इंडेक्स जवळपास फ्लॅट आहे.
किती घसरले BSE मार्केट कॅप
बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 5.93 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. गुंतवणूकदारांची संपत्ती 5.93 लाख कोटींनी कमी झाली आहे. त्यांचा पैसा बुडाला. बुधवारी बीएसईवरील सूचीबद्ध सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,52,60,266.79 कोटी रुपये होते. गुरूवारी बाजार सुरू होताच मार्केट कॅप 4,46,66,491.27 कोटी रुपयांवर आले. म्हणजे गुंतवणूकदारांना 5.93 लाख कोटींना फटका बसला.
