Tomato Price : टोमॅटो लालेलाल; किंमती वाढल्याने ग्राहक धास्तावला, गगनाला भिडणार भाव?
Tomato price hike : टोमॅटोच्या किंमतींनी शंभरी ओलांडली आहे. राज्यातच नाही तर देशातील अनेक टोमॅटोचा भाव 100 ते 120 रुपयांच्या घरात पोहचला आहे. यावर्षी कांदाने ग्राहकांना दिलासा दिला आहे तर शेतकऱ्यांना हैराण केले आहे.

टोमॅटो गृहिणींचे किचन बजेट कोलमडत आहे. टोमॅटोच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादन होणाऱ्या महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटकासह इतर राज्यात मुसळधार पावसाने पिकाचे नुकसान तर झालेच आहे. पण मालही वेळेत बाजारपेठेत पोहचला नाही. त्यामुळे टोमॅटोची आवक घटली आहे. भाव वधारला आहे. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात टोमॅटोचा भाव 100-120 रुपयांदरम्यान पोहचला आहे. टोमॅटोची सरासरी किंमत 50.88 रुपये किलो इतकी आहे.
किरकोळ बाजारात किती महाग?
दिल्लीतील किरकोळ बाजारात टोमॅटो 80-100 रुपये किलो विक्री होत आहे. महिनाभरापूर्वी हा भाव 40-60 रुपयांदरम्यान होता. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, टोमॅटोची सरासरी किंमत 50.88 रुपये किलो आहे. महिनाभरापूर्वी ही किंमत 39.30 रुपये किलो होती. महिन्याभरात टोमॅटोचा दर दुप्पट झाल्याचे समोर येत आहे. तर महाराष्ट्रात टोमॅटोचा सरासरी भाव 38.37 रुपयांहून 48.37 रुपये, मध्य प्रदेशात हा भाव 38.7 रुपयांहून थेट 52.34 रुपयांवर पोहचला आहे. उत्तर प्रदेशात हा दर 38.78 रुपयांहून 63.50 रुपयांवर तर दिल्लीत टोमॅटो 53 रुपयांहून थेट 73 रुपयांवर झेप घेतली आहे. अर्थात किरकोळ बाजारात सरासरी किंमतींपेक्षा ग्राहकांना 30 ते 50 रुपये अधिक मोजावे लागत आहेत.
टोमॅटोचा भाव का वधारला?
भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे यांनी टोमॅटोचा भाव का वाढला याची माहिती दिली. जून आणि जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. त्याचा फटका अनेक नगदी पिकांना बसला, असे ते म्हणाले. टोमॅटोचे 30 ते 40 टक्के नुकसान झाले. पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्याचा फटका ही टोमॅटो पुरवठ्यावर होत आहे. कर्नाटकमधून टोमॅटोची आवक 35 टक्क्यांहून घसरून ती 82 हजार टनावर आली आहे. तर उत्तर भारतातील टोमॅटोचा आवक जुलै महिन्यात 4.16 टनावर आली आहे. या सर्व घडामोडींमुळे टोमॅटोचा भाव वधारला आहे.
कधी मिळणार दिलासा
टोमॅटोची ही दरवाढ फार काळ राहणार नाही. 20 ऑगस्ट रोजी नवीन पिक हाती येईल. नवीन पिक आल्यानंतर टोमॅटोच्या किंमती खाली उतरतील. गाढवे यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात नाशिक पट्यात टोमॅटोचे नवीन पिक येईल. त्यानंतर टोमॅटोचा भाव नियंत्रणात येईल. त्यामुळे टोमॅटोचा भाव 30 रुपये किलोपर्यंत घसरेल.
