चक्रवाढ व्याज म्हणजे काय रे भाऊ? सोप्या भाषेत जाणून घेऊया
भारतात काही सरकारी योजनांवर चक्रवाढ व्याज मिळते. चक्रवाढ व्याजाची गणना सामान्य व्याजापेक्षा वेगळ्या पद्धतीने केली जाते. चक्रवाढ व्याज म्हणजे काय आणि गुंतवलेली रक्कम वेगाने कशी वाढते, याविषयी पुढे विस्ताराने जाणून घ्या.

चक्रवाढ व्याजाबद्दल आपण अनेकदा ऐकले असेल. परंतु, चक्रवाढ व्याज कसे मोजले जाते आणि कोणत्या बचत योजना चक्रवाढ व्याज देतात हे आपल्याला माहित आहे का? चक्रवाढ व्याजामुळे पैसा झपाट्याने वाढतो. भारतात काही खास सरकारी योजना आहेत ज्यात चक्रवाढ व्याज दिले जाते. विशेष म्हणजे या योजना गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. चक्रवाढ व्याज म्हणजे काय आणि गुंतवलेली रक्कम वेगाने कशी वाढते, याविषयी जाणून घेऊया.
चक्रवाढ व्याज म्हणजे काय?
चक्रवाढ व्याज म्हणजे मूळ रकमेवर (गुंतवलेली रक्कम) मिळणारे व्याज आणि त्यातून मिळणारे व्याज होय. सोप्या भाषेत सांगायचे तर चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर देण्यात येणाऱ्या व्याजाची रक्कम.




मूळ रकमेवर साधे व्याज दिले जाते. तर, चक्रवाढ व्याजाची गणना मूळ रक्कम आणि मागील कालावधीतील संचित व्याजावर केली जाते आणि म्हणूनच त्याला “व्याजावरील व्याज” असे म्हटले जाऊ शकते. त्यामुळे चक्रवाढ व्याजाशी निगडित बचत योजनांमध्ये पैसा वेगाने वाढतो. हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया.
चक्रवाढ व्याजाने अशा प्रकारे वाढतो पैसा
जर तुम्ही 10 टक्के साध्या वार्षिक व्याज असलेल्या योजनेत 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरवर्षी 1 लाख रुपये व्याज मिळेल. यामध्ये तुम्हाला 5 वर्षांच्या कालावधीत एकूण 15 लाख रुपये मिळतील.
मात्र, चक्रवाढ व्याजामध्ये 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसाठी पहिल्या वर्षी 1 लाख रुपये, तर दुसऱ्या वर्षी 11 लाख रुपये (मुद्दल+व्याज, व्याजासह) 1.10 लाख रुपये मिळतील. अशा प्रकारे 10 लाख रुपयांची गुंतवणूक 5 वर्षांच्या कालावधीत 16,10,510 रुपये (10 लाख रुपये मुद्दल + 6,10,000 रुपये व्याज) पर्यंत वाढेल.
जर तुम्ही साध्या 10 टक्के वार्षिक व्याजाने 10 लाखांची गुंतवणूक केली असती तर 5 वर्षांनंतर तुम्हाला 15 लाख रुपये मिळाले असते, पण चक्रवाढ व्याजामुळे हा परतावा वाढला.
‘या’ योजनांवर चक्रवाढ व्याज
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट आणि काही फिक्स्ड डिपॉझिट सारख्या लोकप्रिय बचत योजनांमध्ये चक्रवाढ व्याज मिळते. एफडीमध्ये बँका गुंतवणूकदारांना ठराविक कालावधीच्या मुदत ठेवींवर चक्रवाढ व्याज देतात.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)