जगातील तीन देशात रुपे कार्ड लाँच, भारताला फायदा काय?

यापूर्वी सिंगापूर आणि भूटाननेही रुपे कार्ड (RuPay Card) लाँच केलं होतं, तर मालदीवही लवकरच रुपे कार्ड लाँच करणार असल्याचं मोदींनी त्यांच्या 8 जून 2019 रोजी मालदीवच्या संसदेतील संबोधनात सांगितलं होतं.

जगातील तीन देशात रुपे कार्ड लाँच, भारताला फायदा काय?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन देशांच्या दौऱ्यावर असताना संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये रुपे कार्डचा (RuPay Card) वापर करुन प्रसाद खरेदी केला. बहरेनमधील श्रीनाथ मंदिरात जाण्यापूर्वी मोदींनी यूएईमध्ये भारतीय रुपे कार्ड (RuPay Card) लाँच केलं आणि पहिला व्यवहारही त्यांनी स्वतःच केला. यासोबतच रुपे कार्ड असणारा यूएई हा तिसरा आणि मध्य पूर्वमधील पहिलाच देश ठरलाय. यापूर्वी सिंगापूर आणि भूटाननेही रुपे कार्ड (RuPay Card) लाँच केलं होतं, तर मालदीवही लवकरच रुपे कार्ड लाँच करणार असल्याचं मोदींनी त्यांच्या 8 जून 2019 रोजी मालदीवच्या संसदेतील संबोधनात सांगितलं होतं.

रुपे कार्ड काय आहे?

भारतीय वित्त समावेशनात रुपे कार्ड अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. बँक शाखांमध्ये जाऊन रांगेत उभं राहून पैसे काढण्यापासून सुटका या रुपे कार्डमुळे झाली. यापूर्वी ज्यांच्याकडे कार्ड नव्हतं, त्यांना पैसे काढण्यासाठी बँकेत जावं लागत होतं, ज्यात वेळही व्यर्थ जात होता. आता सहज एटीएममध्ये जाऊन पैसे काढता येतात आणि बँक खातं असणाऱ्या गरीब व्यक्तीलाही रुपेचा वापर करता येतो.

रुपे भारताच्या डिजीटल व्यवहारात अत्यंत मैलाचा दगड ठरला आहे. कारण, एटीएम व्यवहारासोबतच ऑनलाईन व्यवहारासाठीही रुपेचा वापर केला जात आहे. परदेशातील कार्ड कंपन्यांचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) कडून 20 मार्च 2012 रोजी रुपे कार्ड लाँच करण्यात आलं होतं.

Visa, MasterCard, Discover, Dinner Club आणि American Express यांसारख्या कंपन्यांचं जाळं जगभरात आहे. शिवाय बँकांकडूनही हेच कार्ड दिले जातात. बँकांकडून Visa, MasterCard आणि RuPay या कार्डचा पर्याय दिला जायचा. पण अमेरिकन कंपन्यांकडून घेतलं जाणारं कमिशन आणि शुल्क हे सामान्य ग्राहकांना न परवडणारं आहे हे जाणवू लागलं. यानंतर डिजीटल ट्रान्जॅक्शनला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने रुपेवर जास्त भर दिला. रुपेवर आता भारतात कुठेही पैसे काढता येतात, शिवाय कुठेही स्वाईप करुन व्यवहार करता येतात.

रुपे कार्ड परदेशात लाँच केल्याचे फायदे

रुपे हे भारतापुरतं मर्यादित असल्याने एखादा ग्राहक दुबईला पर्यटनासाठी गेल्यास त्याला रुपेचा वापर करणं शक्य नव्हतं. सिंगापूर, भूटान या देशांमध्येही पर्यटकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. दुबईला पर्यटनासाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या जास्त आहे, शिवाय मालदीव हे देखील भारतीयांचं पर्यटनासाठी आवडतं ठिकाण आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मालदीवमध्येही रुपे सुरु होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय सुरक्षा

2014 मध्ये रशियाने युक्रेनमधील एका मोठ्या भागावर कब्जा केला. त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियावर सँक्शन्स लादले. परिणामी अमेरिकन कार्ड कंपन्यांनीही रशियन ग्राहकांचे ट्रान्जॅक्शन थांबवले. त्यामुळे स्वतःकडे कार्ड असूनही रशियातील लोकांना त्याचा वापर करता आला नाही. यामध्ये मोठा काळ गेला आणि पैसे असूनही त्याचा वापर न करता आल्याने ग्राहकांना संकटाला सामोरं जावं लागलं.

आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने रुपे हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. कारण, आतापर्यंत अमेरिकन कंपन्यांचं वर्चस्व असलेल्या कार्ड क्षेत्रात रुपेचंही वर्चस्व निर्माण झालं आहे. ग्राहकांना अत्यंत कमी शुल्कामध्ये हे कार्ड अनेक सोयी उपलब्ध करुन देतं. याशिवाय परदेशातील काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळावरही हे कार्ड आता चालणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *