सेन्सेक्स-निफ्टीची दमदार कामगिरी, 7 ऑक्टोबरला मार्केटमध्ये होणार बदल? तज्ज्ञांचा अंदाज काय?
आज मार्केट तेजीसह बंद झालं असून गेल्या दोन दिवसांपासून सलग मार्केट तेजीमध्ये असल्याचं बघायला मिळालं. मात्र, 7 ऑक्टोबरला मार्केटमध्ये बदल होणार का? यावर तज्ज्ञांनी मोठा अंदाज व्यक्त केला आहे.

भारतीय शेअर बाजारात 6 ऑक्टोबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी दमदार तेजी नोंदवली गेली. जागतिक संकेत, कच्च्या तेलाच्या किमतीतील नरमाई आणि काही कंपन्यांचे सकारात्मक तिमाही अपडेट्स यामुळे बाजारातील वातावरण गेल्या तीन दिवसांपासून सकारात्मक राहिले आहे. आज दिवसअखेर सेन्सेक्स 685.34 अंकांनी म्हणजेच 0.95 टक्क्यांनी वाढून 73067.81 अंकांवर तर निफ्टी 220.35 अंकांनी म्हणजेच 0.98 टक्क्यांनी वधारून 22776.10 अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात सुमारे 2685 शेअर्समध्ये तेजी तर 1495 शेअर्समध्ये घसरण झाली. 197 शेअर्समध्ये कोणताही मोठा बदल झाला नाही.
या शेअर्समध्ये झाली मोठी वाढ
निफ्टीमध्ये ट्रेंट, कोटक महिंद्रा बँक, एचयूएल, एचडीएफसी लाइफ आणि जिओ फायनान्शियल हे शेअर्स आघाडीच्या तेजीत राहिले. दुसरीकडे कोल इंडिया, टेक महिंद्रा, मॅक्स हेल्थकेअर, आयटीसी आणि इन्फोसिस या शेअर्समध्ये दबाव पाहायला मिळाला.
ब्रॉडर मार्केटमध्येही खरेदीचा उत्साह दिसून आला. निफ्टी मिडकॅप इंडेक्स 1.08 टक्क्यांनी तर स्मॉलकॅप इंडेक्स 1.5 टक्क्यांनी वधारला.
कोणत्या सेक्टरमध्ये तेजी आणि कुठे दबाव?
सेक्टरनुसार पाहता बँकिंग, कन्झ्युमर ड्युरेबल्स, एनर्जी, इन्फ्रा, मीडिया, एफएमसीजी, मेटल, फार्मा, ऑइल अँड गॅस, प्रायव्हेट बँक आणि टेलिकॉम क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.
दुसरीकडे रिअल्टी, आयटी आणि पीएसयू बँक निर्देशांकांमध्ये घसरण झाली. त्यामुळे बाजारात एकूणच तेजी असली तरी काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव कायम असल्याचे चित्र आहे.
पुढील काळात बाजाराची दिशा कशी असणार?
कोटक सिक्युरिटीजचे हेड इक्विटी रिसर्च श्रीकांत चौहान यांच्या मते, बाजाराने आज सकारात्मक मोमेंटम कायम ठेवला. तांत्रिकदृष्ट्या निफ्टीसाठी 22600 हा महत्त्वाचा सपोर्ट झोन मानला जात आहे. निफ्टी या पातळीच्या वर टिकून राहिल्यास पुढील काळात 22950 ते 23000 या पातळीपर्यंत तेजी दिसू शकते. मात्र, 22600 च्या खाली घसरण झाल्यास निफ्टी 22500 ते 22450 पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
रेलिगेअर ब्रोकिंगचे SVP-Research अजीत मिश्रा यांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीतील नरमाई आणि कंपन्यांकडून मिळालेले सकारात्मक तिमाही अपडेट्स यामुळे बाजाराच्या सेंटीमेंटला आधार मिळाला. मात्र, जागतिक यिल्डमधील वाढ आणि विदेशी गुंतवणूकदारांची विक्री यामुळे बाजारातील सावध भूमिका कायम आहे.
निफ्टीसाठी 22800 ते 22850 हा तातडीचा रेजिस्टन्स झोन मानला जात आहे. त्यानंतर 23000 ते 23200 हा महत्त्वाचा रेजिस्टन्स ठरू शकतो. तर 22600 ते 22400 हा शॉर्ट टर्म सपोर्ट झोन आहे.
